जमिनी गेल्या, मोबदला रखडला ;महापारेषणच्या कार्यालयात खेटे घालून शेतकरी बेजार

वाडा तालुक्यात महापारेषणने उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यासाठी मनोरे उभारणीचे काम सुरू केले आहे.

वाडा : वाडा तालुक्यात महापारेषणने उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यासाठी मनोरे उभारणीचे काम सुरू केले आहे. मात्र त्यासाठी जी शेतजमीन संपादित केली आहे, तिचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. गेले वर्षभर त्यासाठी हेलपाटे मारून शेतकरी वैतागले आहेत.
वाडा तालुक्यातील अनेक गावांत महापारेषणतर्फे उच्च विद्युत दाबाच्या वाहिनीच्या उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी वाडा तालुक्यातील अनेक गावांतून शेतजमिनीचे संपादन करण्यात आले आहे. निबंवली, केळठण, लोहोपे, गोराड, डाकिवली, घोणसई, घोडिवदे पाडा, नारे, मांगाठणे, उसर आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापारेषणने संपादित केल्या आहेत. या शेतजमिनींवर आता उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीसाठी मनोरे उभारण्यात आले आहेत. या बाधित शेतकऱ्यांकडून जमिनी घेताना महापारेषणने लवकरात लवकर जमिनीचा योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नाही. गेले वर्षभर शेतकरी महापारेषणकडे हेलपाटे घालून त्रस्त झाले आहेत.
यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने मध्यस्थी करण्याची गरज आहे, असे शेतकरी म्हणतात. तंटामुक्त गाव समिती, तसेच तहसीलदारांनी यांनी मध्यस्थी करून गावपातळीवरील शेतकऱ्यांचे वाद मिटविण्याची गरज आहे, असे मत वाडा तालुक्यातील घोणसई गावातील शेतकरी सुरेश पाटील यांनी मांडले.
संपादित केलेल्या काही जमिनींच्या सातबाऱ्यांवर कुटुंबातील अनेकांची नावे आहेत. भरपाई मिळण्यासाठी सर्वानी दावा केला आहे. अशा भाऊबंदकीतील वादांमुळे काही शेतकऱ्यांचा मोबदला देणे बाकी आहे. ज्या शेतजमिनींविषयी असे वाद नाहीत, त्यांचा मोबदला देण्यात आला आहे. -चंद्रशेखर मदनकर, साहाय्यक अभियंता, महापारेषण

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lands gone compensation stagnant farmers are fed up office mahatrans amy

Next Story
पालघर तालुक्यातील किनारपट्टीतील गावांचा पाणीप्रश्न गंभीर ;सदोष पाणीपुरवठा योजनेचा ग्रामस्थांना फटका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी