scorecardresearch

डहाणूत शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास ; शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना होडीशिवाय पर्याय नाही

डहाणू तालुक्यातील दुर्गम भागात तसेच खाडी आणि नदी किनाऱ्यावरील कित्येक गावांना आजही होडीशिवाय पर्याय नाही. येथील मुलांना नदी पलीकडील असलेल्या शाळा-महाविद्यालयातील शिक्षणासाठी होडीतून प्रवास करावा लागत आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील दुर्गम भागात तसेच खाडी आणि नदी किनाऱ्यावरील कित्येक गावांना आजही होडीशिवाय पर्याय नाही. येथील मुलांना नदी पलीकडील असलेल्या शाळा-महाविद्यालयातील शिक्षणासाठी होडीतून प्रवास करावा लागत आहे. काही वेळा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या होडीतून प्रवास करीत असल्यामुळे त्यांच्या जिवावर बेतण्याची भीती येथे व्यक्त केली जाते.
दरवर्षी पावसाळय़ात येथील नदीला पूर येत असल्याने होडी वाहतुकीला धोका निर्माण होतो. होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवत असल्याने होडी बुडण्याची किंवा पाण्यात कलंडण्याची शक्यताही असते. तालुक्याच्या ठिकाणी असलेली महाविद्यालये व खाडीपलीकडे प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळय़ातील पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांनाही होडीनेच पलीकडे सोळशेत येथे येऊन एस.टी.ने तलवाडा आणि पूज्य आचार्य भिसे हायस्कूल गाठावे लागते. थेरोंडा परिसर येथील प्रवाशांनाही तसेच विद्यार्थ्यांना खाडी किनाऱ्यावरील बंधाऱ्याने अडचणीच्या पायवाटेने मोठे अंतर गाठावे लागते. किनाऱ्याने पुढे गेलेला बंधारा ढासळला असून काटयाकुटयांतून, बंधाऱ्याच्या ढासळलेल्या बाजूकडून चालावे लागते.
पावसाळयात ही नदी दुथडी भरून वाहते. नदीला आलेल्या पुराने परिसर पाण्याखाली जातो. त्यामुळे खाडीपलीकडे जाण्यासाठी सोयिस्कर असा पूल-बंधारा बांधावा अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ करत आहेत. त्यानुसार नाबार्डमधून पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे पण, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सूर्या नदीवरील पुलाची प्रतीक्षा
सूर्या नदीमुळे डहाणू तालुक्यातील एकूण महसूल गावे २९ व विक्रमगड तालुक्यातील १७ महसूल गावे विभागली गेली आहेत. सूर्या नदीवर पूल नसल्याने सायवन, उधवा, दादरा नगर हवेली, दिवशी, दाभाडी, किन्हवली, सायवनहून गांगोडी, शेणसरीजवळचा प्रवास दळणवळणाच्या सुविधाअभावी तुटलेला आहे. सूर्या नदीवर पूल झाल्यास नागरिकांना तसेच वाहतूकदारांना कमी अंतराचा प्रवास करता येणार आहे.


सूर्या नदीवरील कोशेसरी येथील हा पूल अंदाजे १५० मीटर लांबीचा पूल असून त्याचे मोजमाप घेतले गेले आहे. त्यासाठी अंदाजे ६ कोटीहून अधिक निधी लागणार असून हे काम नाबार्डमध्ये सुचवले आहे.-अजय जाधव, उप अभियंता सा.बा.डहाणू

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lifechanging journey education dahanu students choice school college without boat study education amy

ताज्या बातम्या