पालघर : रेल्वे प्रशासनातर्फे समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाची उभारणी करताना सफाळे प्रमाणेच केळवे रोड येथील पूर्व व पश्चिम भागाची जोडणी (कनेक्टिव्हिटी) ठेवण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली नसल्याने पर्याय उपलब्ध होईपर्यंत हा मालवाहू मार्ग सुरू करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या विरोधात परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांच्यातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

केळवा रोड रेल्वे स्थानकाच्या लगत भुयारी मार्ग असून पावसाळ्याच्या दिवसात हा मार्ग पूर्णपणे बंद होतो. सफाळे व केळवे दरम्यान रोठे येथील रेल्वे फाटक बंद करताना तसेच केळवा रोड आणि पालघर दरम्यान मोहपाडा येथील फाटक बंद करताना त्या ठिकाणी भुयारी मार्ग (सबवे) देण्यात आले होते. मात्र या परिसरात २२०० ते २६०० मिलिमीटर पाऊस पडत असल्याने संपूर्ण पावसाच्या हंगामामध्ये या भुयारी मार्गांमध्ये चिखल तसेच पाणी साचल्याने त्यामधून प्रवास करणे अशक्य होते.

या पार्श्वभूमीवर केळवे रोड परिसर कृती समितीने सन २०१९ पासून पूर्व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल मंजूर व्हावा यासाठी मागणी केली होती. केळवे रोड येथील बाजार, रुग्णालय, शाळा व इतर जीवनावश्यक वस्तूंकरिता पूर्वेच्या भागात सुमारे २५ आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे पाच ते सहा हजार आदिवासी व मागासवर्गीय जनतेला पश्चिमेकडे यावे लागते. रेल्वेतर्फे देण्यात आलेला सफाळे उड्डाणपूलाचा पर्याय १५ किलोमीटर दूर असून त्यामुळे नागरिकांना वळसा घालावा लागणार आहे. उड्डाण पुलाच्या मागणीला जिल्हा प्रशासनाने तसेच डीएफसी ने मान्यता दर्शविली मात्र त्याच्या उभारणीबाबत कोणतीह ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे.

रोठे व मोहपाडा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी डीएफसीसी यांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दिले होते. रोठे येथील उड्डाणपुलासाठी ६०.५० कोटी रुपयांचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजीत केला होता तर मोहपाडा वाकसई येथील उड्डाणपुलासाठी निम्मा खर्च मालवाहू रेल्वे प्रकल्प तर निम्मा खर्च जिल्हा प्रशासनाने उचलावा असे विचाराधीन होते. या संदर्भात पत्र फेब्रुवारी २०२१ मध्ये देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हा विषय लांबणीवर पडल्याने केळवे रोड येथील पूर्व व पश्चिमेच्या भागाच्या जोडणीचा विषयावर पुढे निर्णय होऊ शकला न्हवता.

दरम्यान समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याने केळवे रोड परिसर कृती समितीने या मालवाहू रेल्वे मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी काळे झेंडे दाखवणे अथवा रेल रोको करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने रेल्वे पोलिसांनी या समितीचे समन्वय प्रकाश सावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने संबंधितांना समज दिली होती. दरम्यान केळवे रोड परिसर कृती समितीने केळवा रोड भागात उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात खासदार डॉ. हेमंत सवरा यांना मागण्यांचे निवेदन दिले असून याचा पाठपुरावा आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.

भुयारी मार्ग पावसाळ्यात निरुपयोगी

केळवे रोड येथे पूर्व पश्चिम भागाला जोडण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर व्यवस्थापनाने दिलेले भुयारी मार्गाचे पर्याय उपयोगी ठरत नसून या भागाला जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारणे हाच सक्षम व शाश्वत पर्याय राहील असे नागरिकांचे म्हणणे आहे. असा पूल उभारायचा झाल्यास त्याला कोणत्या मुख्य रस्त्याची जोडणी द्यायची, पोहोच रस्ता उभारण्यासाठी भूसंपादन तसेच पुलाच्या उभारणीसाठी खर्च कोणी उचलायचा आदी प्रश्न पुढे आल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे.

केळवे रोड येतील दोन उड्डाण पुलांसह या भागातील चार प्रस्तावित उड्डाण पुलांचा प्रश्न प्रलंबित आहे. या विषयी रेल्वे च्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. या बाबत लवकरच मार्ग निघेल असे अपेक्षित आहे. – डॉ. हेमंत सवरा