बोईसर : पावसाने पालघर जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. बोईसर पूर्व, वाणगाव, शिगाव, ऐना, दाभोण, उर्से येथील भातपिकांची अवस्था त्यामुळे दयनीय झाली आहे. शेत-शिवारांमध्ये पाणी साचून राहिले आहे. भाताच्या आव्यांमध्ये पाणीच पाणी झाल्याने लोंबीतले दाणे कुजण्याची भीती शेतकऱ्याला वाटत आहे.

पालघर शहरासह जिल्ह्यात सगळीकडे धुवाधार पाऊस कोसळत आहे. गेले पंधरा दिवस या अति पावसामुळे शेतात पाणी साचून नुकसान होण्याची वेळ आली आहे. उभ्या शेतातील भाताच्या लोंब्यात तांदळाचा दाणा तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत पावसामुळे अडथळे येत आहेत. असाच पाऊस सुरू राहिला तर दाणे, भाताच्या लोंब्या सारेच कुजून जाईल. यंदा खरेतर सगळीकडे चांगले भातपिक डोलताना दिसत होते. मात्र मध्येच मुक्कामास आलेल्या पावसाने शेतकऱ्याचा जीव टांगणीला लावला आहे. आता पावसातील शेवटचे नक्षत्र हत्ती आणि चित्ता यावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून आहे.
ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पट्टय़ातील शेतकऱ्यांचे जनजीवन शेतीवरच अवलंबून आहे. बोईसर पूर्ण येथील वाणगाव भागांत जवळपास १६०० हेक्टर क्षेत्रात भातशेतीची लागवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी वायएसआर रत्नागिरी ६. कोमल, शुभांगी ९११, गोरक्षनाथ यांच्यासह वेगवेगळय़ा संकरित आणि देशी भात बियाण्यांची लागवड केली आहे. परंतु यंदा पावसाचे प्रमाण वाढल्याने काही शेतकऱ्यांनी लवकर केलेल्या शेतीमध्ये प्राधान्याने भातरोपाची लागवड केली होती. सप्टेंबर महिन्यात शेतातील भाताच्या रोपांना लोंब्या आल्या आहेत. मात्र सततच्या पावसात तेही कुजतील अशी भीती वाटत आहे. पाऊस असाच पडत राहिला तर वरुणराजा तोंडचा घास हिसकावून घेणार की काय? अशी भीती शेतकरीवर्गातून व्यक्त होतेय.

भातपिकांच्या लोंब्या आता तयार झाल्या आहेत, ही पिके शेतात उभी आहेत मात्र सध्याच्या या मुसळधार पावसामुळे ते कुजण्याची भीती वाटत आहे. – किसन सुमडा, शेतकरी शिगाव