scorecardresearch

अवकाळी पावसामुळे साडेसात कोटींचे नुकसान, नुकसानभरपाईचे सर्वेक्षण अद्याप सुरूच

पालघर जिल्ह्यात १९ मार्चपर्यंत  झालेल्या अवकाळी पावसामुळे १८ हजार ८६९ शेतकरी बाधित झाले आहेत.

pg mango loss fruit
अवकाळी पावसामुळे साडेसात कोटींचे नुकसान

पालघर: पालघर जिल्ह्यात १९ मार्चपर्यंत  झालेल्या अवकाळी पावसामुळे १८ हजार ८६९ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांना सात कोटी ८७ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये २० मार्च रोजी मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे झालेल्या नुकसानभरपाईचे सर्वेक्षण अजूनही सुरू आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ४ ते ७ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस झाला होता. या पावसाचा अधिक फटका जव्हार, मोखाडा, डहाणू व विक्रमगड तालुक्यात बसला होता.  प्राथमिक अंदाजात सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांच्या २०१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.  मात्र प्रत्यक्षात कृषी साहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांनी सर्वेक्षण केल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक शेत अथवा फळपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वेक्षणापेक्षा दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. ३५०२.८३ हेक्टर जमिनीवर शेतकरी व बागायतदारांच्या झालेल्या नुकसानाची अंदाजित रक्कम सात कोटी ८७ लाख ३६ हजार १२० इतकी  आहे.

२० मार्च रोजी वसई तालुक्यात १२ मिलिमीटर, पालघर १० , वाडा  नऊ , तर डहाणू तालुक्यात साडेसहा  मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.   नुकसानीचे सर्वेक्षण सध्या सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कडधान्य, भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे फुले गळून पडण्याचे प्रकार घडले आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या