गिराळे बंदरांमधील घटना

पालघर : वैतरणा खाडीपात्रात गिराळे बंदरांमध्ये पालघर तालुका महसूल विभागामार्फत जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठय़ावर वाळूमाफियांनी डल्ला मारला आहे. मंगळवारी ही वाळू वाहतूक वरळी पारगाव रस्त्यावरून राजरोसपणे सुरू होती, त्यामुळे महसूल विभागावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर पालघरच्या तहसीलदारांकडून वैतरणा खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाई करण्यात आली होती. गिराळे बंदरात सुमारे ७० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता. तहसीलदार वाळू बंदरातून माघारी फिरताच वाळूसाठा चोरीला गेला. सोमवापर्यंत तांदूळवाडी, गिराळे, बोट आणि हालोली बंदरांतून दररोज सुमारे तीनशे ते चारशे ब्रास वाळूचे उत्खनन सुरू होते. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी कारवाई करत अलीकडेच दहिसर गाव हद्दीत वाळू वाहतूक करणारे वाहन ट्रक जप्त करून मनोर मंडळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. मात्र मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई न करता वाळूचे वाहन सोडून दिल्याची चर्चा आहे. रविवारी रात्री उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त केला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर मंगळवारी पालघर तहसीलदार यांनी वाळूचे अवैध उत्खनन होणाऱ्या गिराळे बंदरात धाड टाकण्याची मोहीम आखल्याच्या आधीच येथे वाळू साठवणुकीचे खड्डे माफियांनी गायब केले. तेथे असलेली वाळू महसूल विभागाने जप्त केली असली तरी या रेती बंदरातून वरई पारगाव रस्त्यामार्फत बुधवारी पहाटेपर्यंत वाळूच्या साठय़ातून अनेक ब्रास वाळू माफियांनी चोरली. 

वाळू जप्त केल्यानंतर संबंधिताला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. वाळू साठय़ाचा ताबा त्याच्याकडेच देण्यात आला होता. त्यातील साठा कमी झाला असल्यास कमी झालेल्या साठय़ाएवढा दंड नियमाप्रमाणे त्याच्याकडून आकारला जात आहे.

सुनील शिंदे, तहसीलदार, पालघर तालुका