पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडय़ात सत्ता कायम;  मोखाडय़ात  सत्तापरिवर्तन, तलासरी, जव्हारमध्ये सभापती, उपसभापती बिनविरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांत शुक्रवारी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने पालघर, डहाणू, विक्रमगड व वाडा येथे सत्ता राखली आहे. तर मोखाडय़ात सत्ता परिवर्तन झाले असून येथे  ‘बाळासाहेबांची शिवसेना’ने (शिंदे गट) वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तलासरी, जव्हारमध्ये सभापती, उपसभापती हे बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक पार पडली.  डहाणू वगळता विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, तलासरी, विक्रमगड येथे शांततापूर्ण वातावरणात निवडणूक संपन्न झाली.  डहाणू तालुक्यामध्ये पंचायत समिती सदस्य पळवापळवी नंतर झालेल्या वादामुळे तेथील वातावरण काही काळ तंग राहिले.  निवडणुकीच्या दिवशी  जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.  पंचायत समितीला छावणीचे स्वरूप आले होते.पंचायत समित्यांवर वर्चस्व असलेल्या व जास्त सदस्य संख्या असलेल्या राजकीय पक्षाचे अनेक कार्यकर्ते पंचायत समितीच्या अवतीभवती प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तर काहींनी निवडणुकीच्या अंतिम क्षणी आपल्या सदस्य वर्गाला निवडणूक होत असलेल्या ठिकाणी आणले.

सदस्य वर्ग इतर पक्षाकडे मतदान करू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात होती.  पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा पंचायत समितीवर महाविकास अघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी जव्हार येथे भाजप, तलासरी येथे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष तर वसई येथे बहुजन विकास आघाडीने पंचायत समितीवर आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले.  सभापती व उपसभापती निवडीनंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला व घोषणाबाजी करत आपला विजयाचा आनंद साजरा केला.

जिल्हा परिषदेवर आघाडीचाच वरचष्मा राहणार

सदस्य अपहरणाचा कुटिल डाव शिंदे गटाचा असला तरी ते निष्ठावान सदस्य हे ठाकरे गटातच असतील. जिल्हा परिषदेवर पुन्हा आमचीच सत्ता राहील, असा विश्वास  आमदार तसेचं उद्धव ठाकरे गटाचे पालघरचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी व्यक्त केला. दबावतंत्राचा वापर करून सदस्यांना पळवले जात असल्याच्या प्रकाराचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडी अजूनही खंबीर असून  जिल्हा परिषदेवर आघाडीचाच वरचष्मा राहील असे त्यांनी सांगितले.

मोखाडय़ात बाळासाहेबांची शिवसेना

कासा: पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत तलासरीमध्ये माकप, जव्हार येथे भाजप तर मोखाडा येथे ‘बाळासाहेबांची शिवसेना’चे (शिंदे गट) उमेदवार विजयी झाले.

तलासरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक  बिनविरोध होऊन सभापतीपदी माकपच्या सुनीता जयेश शिंगडा तर उपसभापतीपदी माकपच्या नंदकुमार हडळ यांची निवड झाली. मोखाडा येथे शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले. शिंदे गटाचे   भास्कर थेतले सभापतीपदी तर प्रदीप वाघ उपसभापतीपदी विजयी झाले.  मोखाडय़ामध्ये यापूर्वी सभापती व उपसभापती महाविकास आघाडीचे होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे गटात वर्चस्व राहिले. जव्हार पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या विजया दयानंद लहारे व उपसभापतीपदी दिलीप परशुराम पाडवी यांची बिनविरोध निवड झाली.  जव्हारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता कायम राखली आहे.

डहाणूत अटीतटीच्या लढतीत आघाडीला यश

बोईसर : डहाणू पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी  पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास  आघाडीने बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीत चिठ्ठीद्वारे काढलेल्या कौलामध्ये सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण गवळी तर उपसभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंटू गहला यांनी अखेर बाजी मारली.

डहाणू पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे.  या निवणुकीत  महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती पदासाठी प्रवीण गवळी आणि उपसभापती पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंटू गहला यांनी पुन्हा एकदा आपले उमेदवारी अर्ज भरले होते. तर दुसऱ्या बाजूला विरोधात भाजपचे वसंत गोरवाला आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे भूनेश गोलिम यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरला होता.  मतदानात सभापती आणि उपसभापती दोन्ही गटांना १३-१३ समसमान मते पडल्याने अखेर चिठ्ठी टाकून घेतलेल्या कौलामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली.

 डहाणू पंचायत समिती निवणुकीच्या आधी  सदस्य पळवापळवी आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये परवा रात्री झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण पंचायत समिती परिसरात आज मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक शैलेश काळे आणि पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी स्वत उपस्थित राहून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जातीने लक्ष घालत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

पालघर, वाडा, विक्रमगडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध

पालघर/वाडा:  पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत पालघर, वाडा, विक्रमगडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली.  

वाडा पंचायत समितीमध्ये एकूण १२ सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना पाच, राष्ट्रवादी काँग्रेस चार, भाजप एक व अपक्ष एक असे संख्याबळ आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या ठिकाणी महाविकास आघाडीचीच सत्ता असुन यावेळीही आघाडीच सत्ता कायम ठेवण्यात आघाडीला यश आले आहे. येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अस्मिता लहांगे यांची सभापती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदिश पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.

पालघर पंचायत समितीवर शिवसेनेच्या शैला भरत कोलेकर यांची सभापती म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद ज्ञानेश्वर वडे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. शैला कोलेकर या शिरगाव गणातील पंचायत समिती सदस्य असून त्यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासमोर एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले गेले. तर नवापूर गणातील पंचायत समिती सदस्य मिलिंद वडे यांच्यासमोर भाजपच्या सलोनी वडे व अजय दिवे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र शेवटच्या क्षणाला या दोघांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे मिलिंद वडे  उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून आले.

विक्रमगड पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत कनोजा तर उपसभापती पदासाठी जिजाऊ  संघटनेचे विनोद भोईर यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभापती, उपसभापती या दोन्ही पदांच्या निवडणुकीतसाठी नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अस्मिता लहांगे यांची सभापती तर जगदीश पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

निवडून आलेले सभापती, उपसभापती

पालघर – महाविकास आघाडी

सभापती – शैला कोळेकर (शिवसेना उद्धव ठाकरे)

उपसभापती – मिलिंद वडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

डहाणू – महाविकास आघाडी

सभापती – प्रवीण गवळी ( राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – पिंटू गहला (शिवसेना उद्धव ठाकरे)

जव्हार- भाजप

सभापती- विजया लहारे

उपसभापती- दिलीप पडवी

वाडा – महाविकास आघाडी

सभापती – अस्मिता लहांगे (शिवसेना ठाकरे गट)

उपसभापती – जगदीश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

तलासरी – माकप

सभापती – सुनीता शिंगडा

उपसभापती – नंदकुमार हाडळ

वसई- बविआ

सभापती – अशोक पाटील

उपसभापती – सुनील अंकारे

विक्रमगड – महाविकास आघाडी

सभापती – यशवंत कनोजा (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – विनोद भोईर (जिजाऊ  संघटना)

मोखाडा – शिवसेना (शिंदे गट)

सभापती – भास्कर खेतले

उपसभापती – प्रदीप वाघ

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi won highest panchayat samiti chairman and deputy chairman election palghar district zws
First published on: 12-11-2022 at 04:08 IST