कासा : पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला १२ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. पौर्णिमेला सुरू होऊन अमावस्येपर्यंत चालणारी ही पंचक्रोशीमधील सर्वात मोठी यात्रा म्हणून महालक्ष्मीची यात्रा प्रसिध्द आहे. महालक्ष्मी मातेचे महात्म्य लक्षात घेता गुजरात, राजस्थान, नाशिक तसेच अनेक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील रोज लाखोच्या (मोठ्या) संख्येने भाविक यात्रेनिमित्त येथे दर्शनाला येतात. महालक्ष्मीची यात्रा म्हणजे देवीचे दर्शन आणि भुजिंग, मासे हे अनेक वर्षांचे समीकरण बनले आहे. ही यात्रा म्हणजे खवय्यांसाठीची एक परवणी आहे. या दृष्टीने देवीच्या दर्शनानंतर भाविक यात्रेचे आकर्षण असलेल्या मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मच्छी मार्केट, भुजिंग गल्ली
तसेच बकरा मार्केट या ठिकाणांना प्रामुख्याने भेट देतात.
काही जण खाण्यास तयार असलेले भुजिंग, मटन, चिकन, मासे घेतात तर काहीजण जेवणाचे साहित्य म्हणजेच भांडी व इतर साहित्य घेऊन येतात. यामुळे मांसाहारी दुकानांबरोबरच विविध प्रकारच्या मसाल्यांची दुकाने मांसाहारी पदार्थांच्या आसपास पहावयास मिळतात. यामध्ये साधारणपणे मसाला विक्रेत्यांची ६० च्या आसपास दुकाने आहेत.तर मांसाहार मासे मटण खिमा अशी जवळपास ३५० हुन अधिक दुकाने पाहायला मिळतात
महालक्ष्मी यात्रेत उपलब्ध होणारे मासे व त्यांचे प्रती किलो :
दाडा १४०० रुपये, घोळ १२००रुपये, साधारणपणे १५ ते २० किलो माशाचा एक नग असतो. खारा/खार (मीठ लावून वाळवून ठेवलेले) दाडा मासा एक नग साधारणपणे अर्धा किलो वजनाचा १०० तर मुशी खारा मासा ५०० रुपये, करंदी ५० वाटा, बोंबील ५० रुपये वाटा, चिकन भुजिंग बनवून ४०० रुपये प्रति किलो, मटन ८०० रुपये किलो, मटन खिमा ८५० रुपये किलो, तर तयार मटन 350 रुपये तर तयार खिमा २०० रुपये किलो, सिंगल आमलेट पाव १५ रुपये.
याखेरीज गरम मसाला प्रति किलो ३०० ते ४०० रुपये, हळद पावडर – धना पावडर २४० दर तसेच आगरी मसाला २०० ते ३०० रुपये किलो. तर पांढरा कांदा एक माळ साधारणपणे दोन किलो १२० रुपये. एकंदरच १५ दिवसांच्या यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर मटन आणि खिमाची विक्री होते. याखेरीज दैनंदिन उपजीविकेच्या वस्तूंची किरकोळ तसेच काही प्रमाणात घाऊक स्वरूपात खरेदी विक्री होते. यामुळे डहाणू व परिसरात आदिवासी नागरी वर्षभरासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तर काही विक्रीसाठी या यात्रेला भेट देत असतात.