निखिल मेस्त्री, पालघर

पालघर : पालघर जिल्ह्यातील जवळपास ९०० शिक्षकांची बदली होणार आहे. आधीच शिक्षकांची कमतरता आहे, त्यात शिक्षकांच्या मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात आधीच शिक्षकांची २७ टक्के पदे रिक्त आहेत. 

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्टय़ा सरकारी शिक्षण व्यवस्थाच आधारस्तंभ आहे. जिल्ह्यात प्राथमिक विभागाच्या सुमारे दोन हजार शाळा आहेत. काही ठिकाणी चौथी तर काही ठिकाणी सातवीपर्यंतच्या शाळा आहेत. जिल्हा स्थापन झाल्यापासून शाळांमध्ये शिक्षकांची जाणवणारी चणचण आजही कायम आहे. अनेक ठिकाणी एकशिक्षकी शाळा तर अनेक ठिकाणी चार ते पाच वर्गाना दोन शिक्षकच आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही सुमार राहत आहे.

जिल्हा स्थापनेपासून शिक्षक संवर्गाची २० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. अनेक शिक्षक जिल्ह्याबाहेर बदलीने जाण्यास इच्छुक असले तरी जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या लक्षात घेता त्यांची बदली करू नये, असा निर्णय पालघर जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये २०१९-२० मध्ये व त्यापूर्वीही घेतला होता.

सात-आठ वर्षांपासून आंतरजिल्हा बदली पालघर जिल्ह्यात थांबली होती. मात्र आता २२ डिसेंबर रोजी शासनाने आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना सोडावे, असा निर्णय घेतल्यामुळे त्यानुसार सुमारे ४७५ शिक्षक इतर जिल्ह्यांत बदलीने जातील. त्यामुळे ही पदे रिक्त होतील. जिल्हा विभाजनानंतर समायोजन प्रक्रियेमध्ये ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी विकल्प दिलेले ३७५ शिक्षकही जिल्ह्यातून जाणार असल्याने ती पदेही रिक्त होतील. याउलट जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या दोनआकडीही नाही. वार्षिक शालान्त परीक्षेनंतर या शिक्षकांची बदली होणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांची चणचण भासणार असून परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याच्या प्रश्न उपस्थित होणार आहे.

चार वर्गासाठी दोनच शिक्षक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाअंतर्गत विविध माध्यमांच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या सुमारे दोन हजार शाळा आहेत. या शाळांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ४० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला एक शिक्षक आवश्यक आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थी संख्या लक्षात घेता चार वर्गासाठी दोन तर काही ठिकाणी एक शिक्षक आहेत. शिक्षकांची बदली झाल्यास ग्रामीण भागात शून्यशिक्षकी शाळासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एकही शिक्षक जिल्ह्याबाहेर न पाठवण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत.   – पंकज कोरे, उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण समिती, जि. प. पालघर

जोपर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांची भरती होत नाही, तोवर कोणतेही शिक्षक जिल्ह्याबाहेर आम्ही पाठवणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत.

– प्रकाश निकम, अध्यक्ष, जि. प. पालघर

जिल्ह्यातील रिक्त पदे

माध्यम        मंजूर   भरलेली         रिक्त

मराठी         ७०९७   ५१८१         १९१६

उर्दू          १२०   ६३            ५७

हिंदी           २१     १०            ११

गुजराती        ५४     ३६            १८

एकूण          ७२९२   ५२९०   २००२