पालघर : पाकिस्तानमध्ये तुरुंगात असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील १८ मच्छीमारांच्या कुटुंबीयांना सरकारने मंजूर केलेल्या मदतीपैकी १६.२० लक्ष रुपयांची मदत अदा करण्यात आली असून सप्टेंबर २०२५ पर्यंत या कुटुंबीयांना द्यावयाच्या मदत रकमेची मागणी जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाने राज्य शासनाकडे केली आहे.

गुजरात मधील बोटींमधून मासेमारी करताना भारताची हद्द ओलांडल्याच्या कारणावरून पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने मासेमारी बोटींना ताब्यात घेऊन मच्छीमारांना तुरुंगात ठेवले आहे. सद्यस्थितीत १९९ भारतीय मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात असून त्यापैकी १९ खलासी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. पहिल्यांदा अटकेत असणाऱ्या गुजरातच्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना गुजरात सरकार प्रतिदिन ३०० रुपये इतकी मदत करत असते. मात्र गुजरात सरकारने महाराष्ट्रातील मच्छीमार खलाशांना ही मदत देण्यास नकार दिल्याने या प्रकरणात पाठपुरावा केल्यानंतर २ ऑगस्ट २०२३ रोजी अशाच पद्धतीच्या अनुदानाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती.

पाकिस्तान तुरुंगातील खलाशांच्या कुटुंबियांना मदतीसंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या शासननिर्णयात अनेक तांत्रिक व गुंतागुंतीचे मुद्दे असल्याने ते सोडवण्यासाठी बराच अवधी गेला. ते मार्गी लागल्यानंतर राज्य सरकारने पालघर जिल्ह्यातील पाकिस्तानमध्ये अटकेत असणाऱ्या मच्छीमारांचा तपशील जिल्ह्याकडून मागविला होता. मे २०२५ पर्यंत अटकेत असणाऱ्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना अनुदानापोटी सुमारे ६४.१६ लक्ष रुपयांची मागणी जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाकडून करण्यात आली होती.

लेखाशीर्षकाखालील अर्थसंकल्पात असलेल्या २७ लक्ष रुपयांच्या तरतुदीच्या ६० टक्के मर्यादा राखून राज्य सरकारने १७ जून रोजी मच्छीमार खलासांच्या अनुदानासाठी १६.२० लक्ष रुपये मंजूर केले होते. पाकिस्तान तुरुंगात मृत पावलेल्या विनोद लक्ष्मण कोल या मच्छीमाराच्या कुटुंबीयांना त्याच्या अधिवास काळातील पूर्ण रक्कम (१.६१ लक्ष) तर उर्वरित १८ मच्छीमार खलाशांना २७० दिवसांप्रमाणे प्रत्येकी ८१ लाख देण्याची राज्य सरकारने तरतूद केली होती.

सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत अजूनही ४७.१६ लक्ष रुपयांचा सहायता निधी प्रलंबित असून त्याकरिता मागणी जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाने राज्य सरकारकडे केला आहे. मागणी केलेला निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण तातडीने करण्यात येईल असे मत्स्यव्यासाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी लोकसत्ता ला सांगितले.

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचे मृत्यू

एका भारतीय मच्छीमाराचा मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला. हा मच्छीमार गुजरात महाराष्ट व्यतिरिक्त इतर राज्यातील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी कराची येथील तुरुंगात मृत्यू झालेला हा दुसरा भारतीय मच्छीमार आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात महाराष्ट्राचे १९ मच्छीमारसह एकूण १९९ भारतीय मच्छीमार आहेत. ज्या मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. मृत मच्छीमारांची शिक्षा दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेली आणि त्याची राष्ट्रीयता देखील निश्चित झालेली. दोन्ही देशातील २००८ च्या कराराप्रमाणे त्याला खूप आधी सोडायला पाहिजे होत. मात्र तसे झाले नाही.

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या राज्याच्या १८ मच्छीमारांची शिक्षा दोन वर्षापूर्वी पूर्ण झाली असली तरी ते तुरुंगात आहेत. त्यांच्या कुटुंबांना ठरलेली मदत देखील राज्य सरकारकडून वेळेवर दिली जात नाही. त्यांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या जवळपास १७५ भारतीय मच्छीमारांची शिक्षा आधीच पूर्ण झाली आहे. त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे असे पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी माध्यमांना सांगितले.