पालघर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आयोजित बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील ६९ केंद्रांवरून एकूण ५६,१३९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेचा पहिलाच दिवस आणि त्यातही इंग्रजीचा पेपर असल्याने, परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि तणावाचे सावट स्पष्टपणे दिसून येत होते.
१० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात संपन्न होणारी बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा असल्याने पालकांचेही याकडे विशेष लक्ष लागून आहे. आपले आसन क्रमांक शोधण्यासाठी आणि वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्रांवर एक ते दीड तास आधीच गर्दी केली होती. अनेक केंद्रांबाहेर पालक आपल्या पाल्याला धीर देताना दिसत होते.
परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली आहे. यासाठी १० विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये खालील यंत्रणांचा समावेश आहे. यासह परीक्षार्थींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे यासह माध्यमिक शिक्षणाधिकारी, बैठे पथक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, विशेष महिला भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक या पथकांचा समावेश आहे.
प्रशासनाचे कडक निर्बंध
जिल्हा प्रशासनाने परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ अन्वये बेकायदेशीर जमाव जमवण्यास मनाई केली आहे. तसेच, परीक्षा सुरू असताना केंद्राबाहेरील झेरॉक्स सेंटर्स, फॅक्स आणि एसटीडी बूथ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संतुलित आहार घेऊन आणि पुरेशी झोप घेऊन शांत डोक्याने, भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी आज पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला भेट देऊन परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी वर्गावर्गांत जाऊन पर्यवेक्षण, शिस्त आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. परीक्षार्थींना भयमुक्त वातावरणात पेपर लिहिता यावा, यासाठी केंद्रावरील सोयीसुविधांची पडताळणी करण्यात आली. रवींद्र शिंदे यांनी उपस्थिती नोंद आणि केंद्रस्तरीय यंत्रणेच्या कामकाजाची माहिती घेतली. “गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून, परीक्षा केंद्र प्रमुखांनी जबाबदारीने काम करावे,” अशा कडक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यामुळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी केंद्र प्रशासनावर वचक दिसून आला.
