डहाणू : तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अविनाश धोडी याला सेलवास येथून आज पहाटे अटक करण्यात आली आहे. पाच महिन्यांपासून अशोक धोडी यांची हत्या करून फरार झालेल्या अविनाश धोडी या मुख्य आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून त्याला अखेर सेल्वास मधून अटक करण्यात आली आहे.

जमिनीच्या वादावरून मनात राग धरून अविनाश धोडी याने आपला भाऊ अशोक धोडी यांचे १९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास डहाणू येथून त्यांच्या घरी जात असताना वेवजी घाटातील हिलझील डोंगराचे वळणावर आरोपी अविनाश धोडी याने त्याचे साथीदारांसह अशोक धोडी यांची कार अडवून दमदाटी करून गाडीसह अशोक धोडी यांचे अपहरण केले होते. त्यानंतर अशोक थोडी यांची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व गाडी सरिगाम वाडियापाडा, उमरगाव येथील पाण्याने भरलेल्या खदानीत टाकून दिली होती.

त्यांनतर तब्बल १२ दिवसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरात मधील सरिगाम येथील एका बंद दगड खदानीतील तलावात मिळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी अविनाश धोडी व त्याचे अन्य तीन साथीदार हत्येनंतर फरार झाले होते.

पालघर पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पाच महिन्यांपासून या आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे पथकाने आरोपी याला घोलवड, उमरगांव, वापी (गुजरात) दिव दमन, सिलवासा, इंदोर, राजस्थान इत्यादी परिसरात शोध घेऊन सूत्रांच्या मार्फत माहिती मिळवून आरोपी अविनाश धोडी याला आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास सेलवास येथून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू अंकिता कणसे करीत आहे.

या गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू अंकिता कणसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, गोरखनाथ राठोड, रोहित खोत, राजेश वाघ, सुनील नलावडे, पोलीस हवालदार दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, भगवान आव्हाड, कपिल नेमाडे, विजय ठाकूर, संजय धांगड तसेच पोलीस अंमलदार यांच्या नेमणूक शाखेने पार पाडली.

आरोपी पोलीस ठाण्यातून झाला होता पसार

अशोक धोडी हत्या प्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारी नंतर संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरु असताना मुख्य आरोपी अविनाश धोडी घोलवड पोलीस ठाण्यातून पसार झाला होता. मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निसटल्यामुळे पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांनतर या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर अविनाश धोडी सह तीन जण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने विविध युक्त्या लढवून अखेर मुख्य आरोपीला सेलवास मधून अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यावर २०१६ व २०१८ मध्ये शासनभंग व दारूबंदी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. अशोक धोडी प्रकरणातील त्याचे अन्य तीन साथीदार अद्याप फरार असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येईल. यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक