पालघर: पालघर जिल्ह्यात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून ग्रामीण भागासह शहरी भागातील १३० अंगणवाड्यांमध्ये पोषण पखवाडा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी माता आणि अर्भकांचे पोषण, लाभार्थ्यांसाठी डिजिटल सुलभता आणि बालपणीच्या लठ्ठपणाशी लढा या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

८ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान पालघर जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये पोषणविषयक उपक्रमांची मालिका राबविण्यात आली. यामध्ये पहिल्या १००० दिवसांचे महत्त्व, पोषण ट्रॅकरद्वारे लाभार्थ्यांची डिजिटल नोंदणी, कुपोषणमुक्तीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अतिलठ्ठपणावर प्रतिबंधात्मक उपाय यावर विशेष भर देण्यात आला. या पोषण पखवाडा २०२५ चा सांगता समारंभ २२ एप्रिल रोजी पालघर येथे उत्साहात पार पडला.

सुपोषित बालक – तेजस्वी भारत” या उद्दिष्टाला साधण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘पोषण पखवाडा २०२५’ या जनजागृती मोहिमेच्या सांगता समारंभाला जिल्हा कार्यक्रमाधिकारी व प्रकल्प अधिकारी प्रवीण भावसार, अंगणवाडी प्रमुख सेविका तृप्ती भोये-भडांगे, पालघर बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका, स्थानीय पालक वर्ग तसेच बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या उपक्रमांतून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षण, पालकांचे पोषणविषयक प्रबोधन तसेच अंगणवाडी सेविकांचे कार्य कौशल्य समाजासमोर प्रभावीपणे आले. यावेळी कुपोषणा व त्याचे होणारे दुष्परिणाम बाबत लोकांना जागृत करणे व योग्य पोषण आहार व जीवनशैली स्वीकारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टीएचआर घेण्याबाबत प्रोत्साहित

गर्भवती महिलांना नऊ महिन्यापर्यंत व त्यानंतर लहान बालकांना तीन वर्षापर्यंत घरपोच पोषण आहार प्रशासनाकडून दिला जातो. यामध्ये पौष्टिक पदार्थ नाचणीचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ अशा पोषक पदार्थांचा समावेश असतो. मात्र अनेक पालक तो आहार घेत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या घरपोच आहारापासून पालकांनी स्वतः पाककृती प्रात्यक्षिक बनवून इतर पालकांना घरपोच आहर घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले.

कसा राबविला कार्यक्रम

कुपोषण मुक्तीसाठी 130 ग्रामपंचायतींमध्ये पंधरा दिवसात पोषण पखवाडा राबविण्यात आला. उपस्थित पालकांना अंगणवाडी सेविकांनी पौष्टिक पदार्थ बनवून आहार सुधरवण्याबाबत जागृत केले. पोषण ट्रॅकर अँप मध्ये लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईल मधून नोंदणी करण्यास मार्गदर्शन केले तसेच बालकांची वजन व उंचीची देखील यावी नोंद करण्यात आली.