कासा : आंबा हंगामास पोषक वातावरण असताना गेल्या काही दिवासांपासून वाढलेली उष्णता आणि ढगाळ वातावरणामुळे तलासरी परिसरातील आंबा पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. आलेला मोहोर गळून पडत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
तलासरी तालुक्यात शेकडो हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा पीक घेतले जाते. परंतु सद्या वातावरणातील बदलाला बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. तलासरी परिसरात सकाळी दहा वाजल्यापासूनच कडक ऊन सुरु होते दुपारी त्याची तीव्रता वाढते. गरम हवा नंतर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे त्याचा परिणाम आंबा पीक आणि इतर फळबागांवर होत आहे. झाडावरील मोहर जळून काळा पडला आहे , तर थोडयाफार प्रमाणात झाडावर आंबे आले होते. तेही आता गळून पडत आहेत. कीड रोगाच्या प्रमाणात वाढ होऊन आंबा पिवळा होऊन गळून पडतो. आंबा पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची किटक नाशके आणि फळधारणा चांगले यावे यासाठी औषध फवारणी केली होती. मात्र वातावरणातील बदलामुळे पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अंकुश वळवी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता त्यावर कशी मात करावी यासाठी कृषी अधिकारी अधिकाऱ्यांकडून आंबा बागायतदारांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वेळोवेळी पिकांवर फवारणी करण्यासाठी माहिती दिली जाते. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती देऊन कीटकनाशके व इतर फवारण्या पिकांवर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहेत. हवामान विभागामार्फत हवामानात बदल झाल्याची नोंद घेतली जात असते. त्यानुसार कोणत्या भागात हवामान बदल होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिले जाते.
-के. एस. वसावे, कृषी अधिकारी