बोईसर : मनोर जवळील दगड खाणीत पोहण्यासाठी गेलेली दोन लहान मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला असून दुसऱ्या मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित असून परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या दगड खाणी मृत्यूचा सापळा ठरताना दिसत आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील टाकवहाल गावच्या हद्दीत असलेल्या बंद दगड खाणीच्या पाण्यात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन अल्पवयीन मुले पोहण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यापैकी जिग्नेश विजय पवार (वय ८) आणि आयुष मुकेश पवार (वय १५ ) हे दोन मुले पाण्यात बुडाले. या दुर्घटनेमध्ये तिसरा मुलगा सुदैवाने बचावला आहे.
तिन्ही मुले दुपारच्या रणरणत्या उन्हात दगड खाण्यातील पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेले असता जिग्नेशचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात बुडाला. आयुषने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तो देखील पाण्यात बुडाला. आपले दोन्ही मित्र पाण्यात बुडाल्याचे बघून तिसऱ्या मुलाने घरी धावत येऊन हा प्रकार सांगितल्याने सर्व घटना उघड झाली.
घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर वसई विरार महापालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खाणीत उतरून शोधमोहीम राबवली. दीर्घ प्रयत्नांनंतर जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह हाती लागला. मात्र आयुष मुकेश पवार (वय १५) याचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र रात्रीच्या अंधारात शोध घेण्यात अडचण येत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले.
मृत मुलांची कुटुंबे मूळची इंदौर (मध्य प्रदेश) येथील असून काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मनोर परिसरात वास्तव्यास आली होती. संबंधित कुटुंबे भटक्या जमातीतील असल्याची माहिती पुढे येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात शोकमय वातावरण आहे.
दरम्यान हीच खाण यापूर्वीही जीवघेणी ठरली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी एका महिलेचा कपडे धुण्यासाठी गेलेल्या अवस्थेत पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. परिसरातील बंद अवस्थेतील अनेक उघड्या धोकादायक दगड खाणी आहेत. उन्हाळ्यात या बंद दगड खाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी महिला तसेच आंघोळीसाठी मुले जातात. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वेळा दुर्घटना घडत आहेत. या बंद अवस्थेतील दगड खाणीच्या ठिकाणी दुर्घटना घडू नये याकरिता सुरक्षित उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
