पालघर : राष्ट्रीय महामार्ग लगत टाकवाह (मनोर) येथे २०० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर १ मे पासून सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसात मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या मनुष्यबळाच्या मदतीने तसेच नवीन भरती होईपर्यंत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करून या रुग्णालयातील काही विभाग सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे.
पालघर जिल्ह्याचे नंडोरे येथील सामान्य रुग्णालय उभारण्यासाठी निधीच्या उपलब्धतेचा प्रश्न कायम असून मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे.
लोकप्रतिनिधी यांच्या मागणीवरून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत या आरोग्य संस्थेच्या रंगसंगती मध्ये रुग्णालयाचे रंगकाम हाती घेण्यात आले आहे. आरोग्य संस्थेच्या बाह्य बाजूचे रंगकामाला काही प्रमाणात विलंब झाला असला तरीही रुग्णालय सुरू करण्यासाठी अडचण असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वेगवेगळ्या वार्ड मध्ये अंतर्गत फर्निचर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून पार्टीशन उंचीबाबत अडचण निर्माण झाल्याने पार्टिशनची उंची २५ सेंटीमीटर कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी देखील १ मे पर्यंत रुग्णालयातील काही मजल्याच्या अंतर्गत फर्निचरचे काम पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.
सद्यस्थितीत मनोर येथे ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून त्या ठिकाणी कार्यरत असताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये कार्यरत करण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी २७ वैद्यकीय अधिकारी यांची गरज भासणार असून जोपर्यंत शासनाकडून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीमार्फत ११ महिन्यांच्या करारावर ११ महिन्यांचे वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यासाठी वैद्यकीय संचालक यांची परवानगी प्राप्त असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर १ मे पासून अपघात व बाह्य रुग्णविभाग (कॅज्युअलिटी), जनरल, महिला वॉर्ड, प्रसूती केंद्र तसेच मायनर ऑपरेशन थिएटर सुरू करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग तयारीत असल्याची माहिती देण्यात आली. तरी देखील हाडवैद्य, जनरल सर्जन, भूलतज्ञ व इतर तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ नेमणूक होत नाही तोपर्यंत या ट्रॉमा केअर सेंटरचे इतर विभाग कार्यरत होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
