पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत उभारण्यात येणारे ट्रॉमा केअर सेंटर १ मे पासून सुरू करण्याबाबत सूचना राज्याच्या आरोग्यमंत्री यांनी दिल्या असून बांधकामा संदर्भातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाला आहे. या आरोग्य केंद्रासाठी मार्च महिन्यात २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने केंद्राच्या उभारणीच्या कामांना गती आली आहेत.

सुमारे दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पाच मजली ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येत असून या केंद्राचे बांधकामा संदर्भातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक मजल्यावर आपत्कालीन परिस्थितीसाठी असणाऱ्या फायर डक्टकरिता ५८ दरवाजे बसवण्याचे काम प्रलंबित असून विविध दरवाजांना हँडल लावणे, प्रत्यक्षात दिवे व प्रकाश योजनेशी संबंधित इतर उपकरणे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

याखेरीज रुग्णांसाठी असणाऱ्या खाटा, टेबल, नर्सिंग स्टेशन, कपाटे व इतर उपकरण एका नामांकित कंपनीकडून घेण्यात आली असून स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर त्याची उभारणी फिटिंग करून शीघ्र गतीने करण्यात येईल असे सांगण्यात आले. पाच मजल्यावरील उर्वरित बांधकामाच्या संदर्भातील कामे पूर्ण करण्यासाठी तसेच या सर्व मजल्यांवरील स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र कनिष्ठ अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून संबंधित ठेकेदाराकडून स्वच्छतेसाठी प्रत्येक मजल्यावर ३०-४० कर्मचारी कार्यरत करण्या संदर्भात आखणी करण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन यंत्रणा (फायर हायड्रंट) तसेच त्यासाठी आवश्यक पाण्याचा साठा करणारी टाकी कार्यरत झाली आहे. तर एका अद्ययावत ऑपरेशन थिएटरची उभारणी ७० टक्के पूर्ण झाली असून त्याचे काम देखील महिना अखेरीपर्यंत पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. याखेरीज वेगवेगळ्या दालनांची नावे तसेच दिशा दर्शवणारे फलक देखील महिन्याभरात उभारले जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

१७ एप्रिल पर्यंत पाणी होणार उपलब्ध

या आरोग्य संस्थेला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून १५० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याची आवश्यक असून त्यासाठी तुलसी हॉटेल ते आरोग्य केंद्र दरम्यान खुली चर (ट्रेंच) उभारून त्यामध्ये जलवाहिनी अंथरण्यात येणार आहे. पुढे एमएमआरडीएच्या मदतीने मुख्य जलवाहिनीवरून या आरोग्य केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष टॅपिंग एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात येणार असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठ-दहा दिवसांचा अवधी लागणे अपेक्षित आहे.

या आरोग्य संस्थेच्या भूमिगत पाण्याच्या टाकीमध्ये १६-१७ एप्रिल पर्यंत पाणी येऊन नंतर ओव्हरहेड टाकीमध्ये ते चढवणे तसेच प्रत्येक मजल्यावर असणाऱ्या पाण्याच्या जोडणीची तपासणी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता

या आरोग्य केंद्राचे स्वच्छतेचे काम महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असली तरीही रुग्णांना दाखल करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणणे आवश्यक झाले आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असून या केंद्रासाठी सध्या मनोर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह तीन नवीन वरिष्ठ अधिकारी (दर्जा १) मनोर ट्रॉमा केंद्रासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

आगामी काळात आरोग्य विभागात होणाऱ्या बढती व बदली प्रक्रिये दरम्यान अथवा प्रतिनियुक्तीद्वारे या आरोग्य संस्थेला अधिक मनुष्यबळ पुरवले जाईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. २०० खाटांच्या रुग्णालयाच्या अनुरूप मनुष्यबळासाठी प्रस्तावा ला मंजूरी प्राप्त झाली आहे. काही वैद्यकीय उपकरणे इतर जिल्ह्यांकडून मागवली जाणार असून ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने देखील कात टाकली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याशिवाय प्राणवायूचा रुग्णांच्या खाटांपर्यंत पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांचा खर्च प्राथमिक व सुधारित अंदाज पत्रकामध्ये समाविष्ट करण्यात आला नसल्याने याकामी नव्याने जिल्हा नियोजन समितीकडून आर्थिक तरतूद मंजूर करण्यात येत आहे. प्राणवायू वाहिनी टाकण्यास काही अवधी लागणार असला तरी जिल्ह्याकडे मुबलक प्रमाणात प्राणवायु सिलेंडर उपलब्ध असल्याने ही बाब अडचणीची ठरणार नाही असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

रंगसंगती बाबत नाराजी

या आरोग्य संस्थेला बाहेरून राखाडी रंग देण्यात आला असून या रंगाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ स्तरावरील आरोग्य अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या केंद्राच्या बाहेरून तसेच आत मधून पुन्हा नव्याने आकर्षक रंगरंगोटी करण्याबाबत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्यानंतर त्यामधील बदल निश्चित झाल्याची माहिती पुढे आली आहे.