पालघर : राष्ट्रीय महामार्ग लगत उभारण्यात येणाऱ्या मनोर येथील २०० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटरच्या उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून विद्युत प्रणालीच्या तपासणीचे काम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. रुग्णालयासाठी लागणारी वैद्यकीय उपकरण खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून मनुष्यबळ उपलब्धतेसाठी देखील आरोग्य संचलनालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. हे रुग्णालय १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
सन २०१६ पासून मनोर टाकवहाळ येथे अति दक्षता विभागाच्या २५ खाटांसह २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येत असून या बांधकामाला विलंब झाल्याने सुधारित प्रशासकीय मान्यता व त्या अनुषंगाने वाढीव निधी मंजूर करण्यात आला होता. रुग्णालयाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून पूर्वी दिलेल्या रंगसंगतीमध्ये बदल करून नव्याने रंगरंगोटी देखील पूर्ण झाली आहे.
रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर व वार्डामधील फर्निचर उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून या सर्व वॉर्ड मध्ये विद्युत प्रणाली व उपकरणे सुरू असल्याबाबत तपासणी हाती घेण्यात आली आहे. ही तपासणी पुढील काही आठवडे सुरू राहण्याची शक्यता असून अग्नी सुरक्षे संदर्भात तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणीकरण प्राप्त केले जाणार आहे.
या रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनी वरून रुग्णालयासाठी नळ जोडणी प्रक्रिया पूर्ण झाली असून या जलवाहिनी मधून गळतीसाठीची तपासणी (लिकेज टेस्टिंग) हाती घेण्यात आली आहे. रुग्णालयाच्या पायथ्याशी आवश्यक दाबाने पाणी पुरवठा होण्यास सुरुवात झाल्यानंतर रुग्णालयातील अंतर्गत जलवाहिणींची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.
वैद्यकीय उपकरण प्राप्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काही उपकरणे प्राप्त झाले असून काही उपक्रम येत्या काही दिवसात उपलब्ध होतील असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. ऑक्सीजन वाहिनी टाकण्या संदर्भातील विविध प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. तोपर्यंत जम्बो सिलेंडर व प्राणवायू सिलेंडरच्या माध्यमातून रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी प्राणवायूची व्यवस्था करणे शक्य असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
या रुग्णालयाला सात उद्वाहक असून त्यापैकी चार उद्भवाहकांचे परवाने प्राप्त झाले असून उर्वरित तीन उद्वाहकांची तपासणी पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. रुग्णालयाची साफसफाई गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सुरू असून बांधकामाच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाच्या उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
मनुष्यबळाची कमतरता, ११ तज्ञ डॉक्टर नेमणूक
मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटरसाठी १७५ पद मंजूर असून त्यापैकी ६२ पदांवर नेमणुका झाल्या असून उर्वरित ११३ पद रिक्त आहेत. वर्ग एक च्या १८ जागांपैकी दोन जागा भरल्या असे वर्ग दोन च्या २८ जागांपैकी १६ जागा भरण्यात आले आहेत. वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या १०४ जगांपैकी अवघ्या २६ जागा भरण्यात आले असून वर्ग चार च्या १० पैकी सात तर राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत तेरा जागांपैकी दहा जागा भरण्यात आले आहेत. सद्यस्थितीत भिषक (२), बालरोग तज्ञ (२), त्वचारोग तज्ञ (१), क्षकिरण तज्ञ (१), मानसवओपचार तज्ञ (१), शरीरविकृती तज्ञ (१), पीएसएम (१) अशा १८ तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यां च्या जागांपैकी ११ जागांवर नेमणूका झाल्या असून संवर्ग बाह्य पदांमध्ये अस्थिवंग शल्यचिकित्सक व नेत्र शल्य चिकित्सक अशा १८ पैकी दोन जागांवर नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयासाठी परिचारिका पदावर नेमणूक होणे आवश्यक आहे.
खानपान व्यवस्थेसाठी ठेका प्रलंबित
सध्या मनोर येथे ३० खाटांचे रुग्णालय कार्यरत असून ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यानंतर हे रुग्णालय या नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित होणार आहे. मनोरुग्णालयात रुग्णांच्या खानपानाची व्यवस्था बघणाऱ्या ठेकेदाराकडून २०० खाटांच्या रुग्णालयाच्या अनुषंगाने ठेक्याचा विस्तार करावा लागणार असून या दृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
