पालघर जिल्ह्य़ात निर्बंध शिथिलतेनंतर खरेदी-विक्रीत लाखोंची उलाढाल

पालघर : दिवाळीनिमित्त जिल्ह्य़ातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सराफा बाजारापासून ते मिठाई दुकाने, फुलबाजार, किरकोळ दुकाने आदी ठिकाणी खरेदी उत्साह मोठय़ा प्रमाणात दिसत आहे. या उत्साहात करोनाच्या सर्व नियमांचा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही विसर पडला असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे.  गेल्या दोन- तीन दिवसांपासून प्रतिदिन खरेदी-विक्रीत लाखोंची उलाढाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिवाळीचे उत्साही वातावरण पालघर जिल्ह्य़ात अनेक तालुक्यातील बाजारपेठांत दिसत येत आहे. करोनाकाळात बाजारपेठांतील व इतर खरेदी-विक्रीची दुकाने थंडावली होती, परंतु करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर आणि निर्बंध मोठय़ा प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बाजारपेठा पुन्हा बहरल्या आहेत.  किराणा दुकानाना यंदा मोठा फटका बसला. ऑनलाइन खरेदी व नवनवीन येऊ घातलेले मॉल्स यांच्या आकर्षक योजनांमुळे ग्राहकांचा ओढा तेथे असल्याने स्थानिक किराणा दुकाने हताश व निराशावस्थेत दिसत आहेत.  यंदा महागाईमुळे अनेक ग्राहकांनी खरेदीवर आपला हात आखडता घेतल्याचे दिसून आले. गेल्या दीड वर्षांपासून अनेक सणांवर करोनाचे सावट असले तरी यंदा शासनामार्फत  नियम शिथिल केल्याने व्यापारी, दुकानदार, ग्राहक, सर्वसामान्य जनतेला दिवाळी उत्साहात साजरी करता येत असल्याची प्रतिक्रिया येथे देण्यात येत आहे. 

विक्रेत्यांना दिलासा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड व गर्दी पाहावयास मिळाली.दुकानदार , ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास मिळत होते. सकाळपासूनच ग्राहकांचा ओढा फुलबाजारासह मिठाईची दुकाने याकडे होता. त्यानंतर पूजनाचे औचित्य साधून ग्राहकांचा ओढा सराफा दुकानाकडे मोठय़ा प्रमाणात असल्याचे पाहावयास मिळाले. स्थानिक विक्रेत्यांची बाजारपेठेत रेलचेल असल्याचे दिसत आहे. त्यात महिलांचा अधिकाधिक समावेश आहे. बाजारपेठेत आणलेले हार-तुरे, झेंडूची तोरणे, नवीन भाताची कणसे, कमळफुले, नवीन सडीचा तांदूळ याच्या विक्रीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळत आहे.

डहाणूत झुंबड

डहाणू : डहाणू, कासा, मनोर, वाणगाव येथील बाजारपेठेत पसंतीच्या वस्तू, साहित्य खरेदीसाठी महिला तसेच तरुणींची मोठी गर्दी दिसत आहे. दिवाळीनिमित्त येणाऱ्या नवीन वस्तू खरेदीसाठी कपडे, मिठाई, फटाक्याची दुकाने,  फ्रिज, वाहन, सोने, चांदी आदी दुकानांमध्ये ग्राहकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागांतील रिक्षा तसेच खासगी प्रवासी वाहतूकदारांची प्रवाशी भाडय़ांतून  चांगली कमाई होत आहे.