हुतात्म्याच्या तैलचित्राला तीन वर्षांनंतर शासकीय मान्यता ; हुतात्मा रामचंद्र चुरी यांना ८० वर्षांनंतर ‘ओळख’

चुरी यांचे छायाचित्र, तैलचित्र नसल्यामुळे गेली अनेक वर्षे त्यांना अशीच आदरांजली अर्पण केली जात होती.

हुतात्म्याच्या तैलचित्राला तीन वर्षांनंतर शासकीय मान्यता ; हुतात्मा रामचंद्र चुरी यांना ८० वर्षांनंतर ‘ओळख’

स्वातंत्र्यलढय़ादरम्यान १४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघर येथे झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणाऱ्या पाच जणांपैकी रामचंद्र चुरी यांना अखेर ८० वर्षांनंतर चेहऱ्याची ओळख मिळाली. चुरी यांचे छायाचित्र, तैलचित्र नसल्यामुळे गेली अनेक वर्षे त्यांना अशीच आदरांजली अर्पण केली जात होती. नातलग आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे तैलचित्र बनवण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या तैलचित्राची परवानगी लालफितीत अडकली होती. त्याला अखेर मान्यता मिळाली असून येत्या शुक्रवारी (१२ ऑगस्ट) या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

ब्रिटिश राजवटीविरोधात १९४२ साली पुकारलेल्या चलेजाव आंदोलनादरम्यान पालघर येथे १४ ऑगस्ट १९४२ रोजी काढलेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात पाच जण हुतात्मा झाले. रामप्रकाश भीमाशंकर तिवारी (पालघर), काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), सुकुर गोविंद मोरे (शिरगाव) तसेच रामचंद्र माधव चुरी यांनी या आंदोलनात बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची आठवण म्हणून १४ ऑगस्ट १९४४ रोजी पालघरमध्ये हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला.

दरवर्षी या दिवशी पालघरमध्ये हुतात्मा दिन साजरा केला जातो तसेच कार्यक्रमातून पाचही हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते. मात्र, रामचंद्र माधव चुरी यांचे छायाचित्र उपलब्ध नसल्याने त्यांच्या छायाचित्राची जागा कोरीच राहात असे. याची दखल घेऊन रामचंद्र चुरी यांचे तैलचित्र त्यांचा मुलगा दिवंगत बाबुराव रामचंद्र चुरी यांच्या चित्राच्या आधारे व गावातील वयोवृद्ध, ज्येष्ठ शिक्षक नथुराम देवजी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आले होते. या तैलचित्राला शासनाने मान्यता देण्यासाठी हुतात्म्याचे नातेवाईक जानेवारी २०१९ पासून प्रयत्नशील होते. या प्रकरणी मुरबे ग्रामपंचायत, पालघर तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला होता. या तैलचित्राचे अनावरण करण्याबाबत मुरबे ग्रामपंचायतीने ७ फेब्रुवारी २०२० मध्ये ठराव करून तो ठराव ऑगस्ट २०२० मध्ये पालघरचे तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता मात्र ही बाब लाल फितीमध्ये अडकून राहिली होती. चुरी यांचे नातू राकेश यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा चालवला होता. अखेर पालघर तहसील स्तरावर या तैलचित्राला मान्यता देण्यात आली. तहसीलदार सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, हुतात्म्यांचे नातेवाईक, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी या तैलचित्राचे अनावरण करण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पालघर : मर्जीतल्या ठेकेदारांना कोटय़वधींचा ठेका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी