पालघर: पालघर येथील सिडको औद्योगिक वसाहत चिंटूपाडा परिसरात असलेल्या प्रसिद्ध ‘डुरियन’ फर्निचर कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत कंपनीमधील फर्निचर आणि कच्चा माल जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज दुपारी एक वाजताच्या सुमारास कंपनीच्या उत्पादन विभागातून धूर निघू लागला. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. ही वेळ कामगारांच्या दुपारच्या जेवणाची असल्याने बहुतांश कामगार कंपनीबाहेर होते, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीचे वृत्त समजताच आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगारांनाही तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
डुरियन कंपनीच्या शेजारीच आदिवासी विकास विभागाचे शासकीय मुलांचे वसतिगृह आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना तातडीने इमारतीबाहेर काढले. या तत्परतेमुळे विद्यार्थी सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे.
जम्बो सेलचे नुकसान टळले
दरवर्षीप्रमाणे १ ते १६ फेब्रुवारी दरम्यान कंपनी कडून फर्निचर विक्रीचा ‘जम्बो सेल’ आयोजित करण्यात आला होता. सुदैवाने, हा सेल ज्या ठिकाणी लावला होता, ते ठिकाण मुख्य उत्पादन केंद्रापासून काही अंतरावर असल्याने त्या भागातील साहित्याचे नुकसान टळले आहे. मात्र, उत्पादन युनिटमधील यंत्रसामग्री आणि तयार फर्निचर पूर्णपणे जळून कोळसा झाले आहे.
शॉर्टसर्किटचा अंदाज
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत जीवितहानी झाली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

