scorecardresearch

जिल्ह्यात गोवर प्रसाराची भीती; स्थलांतरित कुटुंबीयांच्या वसाहतींकडे लक्ष; पाच वर्षांखालील सर्व बालकांचे लसीकरण

जानेवारी महिन्यापासून पालघर जिल्ह्यात ६० बालकांना गोवर आजाराची लक्षणे आढळून आली होती

जिल्ह्यात गोवर प्रसाराची भीती; स्थलांतरित कुटुंबीयांच्या वसाहतींकडे लक्ष; पाच वर्षांखालील सर्व बालकांचे लसीकरण
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

पालघर: पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यानंतर एकही गोवर आजाराने ग्रस्त बालक आढळलेले नाही.  जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सर्व बालकांचे लसीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. तरी देखील रोजगारासाठी झालेली स्थलांतरित कुटुंबे आणि लसीकरण न झालेल्या त्यांच्या बालकांकडून या आजाराचा जिल्ह्यात प्रसार होण्याची शक्यता कायम  असून प्रशासन अशा वसाहतींकडे लक्ष केंद्रित करत आहे.

जानेवारी महिन्यापासून पालघर जिल्ह्यात ६० बालकांना गोवर आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्या सर्वाची तपासणी केली असता मार्च, एप्रिल व जुलै महिन्यात प्रत्येकी एक बालकाला गोवर झाल्याचे आढळून आले होते. सध्या जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सर्व बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.  १५ वर्षांखालील कोणत्याही बालकांना ताप, अंगावर पुरळ आल्यास त्यांना या आजाराचे संशयित रुग्ण असे गृहीत धरून त्यांची तपासणी केली जात आहे.

त्याचबरोबर नऊ  महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना दर सहा महिन्याला विटामिन ए ची प्रतिबंधात्मक मात्रा दिली जात आहे. असे असले तरी रोजगाराच्या शोधात राज्यातील विविध भागातून तसेच इतर राज्यातून  जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे. विटभट्टी, इमारतीच्या बांधकामावर ही स्थलांतरित कुटुंबे काम करत असतात. त्यांच्या बालकांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांच्यामार्फत गोवरचा प्रसार होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने अशा स्थलांतरित होणाऱ्या वसाहतींवर लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी नियमितपणे आरोग्यसेवकांमार्फत तपासणी व देखरेख यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

बरोबरीने जिल्ह्यात पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून लसीकरण उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध जिल्हा प्रशासन अग्रक्रमाने घेत असून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासन कार्यरत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

गोवराची लक्षणे

मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंगदुखी, तोंडाच्या आतील भागात पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे, अंगावर पुरळ येणे किंवा रॅश येणे अशी लक्षणे असून या प्रकारची लक्षणे आढळल्यास संबंधित बालकांच्या पालकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातून करण्यात आले आहे. गोवर आजाराचे पोलिओप्रमाणे संपूर्ण  निर्मूलन करणे शक्य असून त्यासाठी लसीकरण हाच त्याच्यावर प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत असून बालकांना गोवरची लस घ्यावी यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

तीन वर्षांतील लसीकरण

पहिला टप्पा

सन          उद्दिष्ट लसीकरण       टक्के

२०१९-२०             ३४११४ ३४९१८       १०२

२०२०-२१       ३४११४  ३५१८५        १०३

२०२१-२२       ३४११४ ३४७७२       १०२

ऑक्टोबर २२    ३४११४  २१९८३        ६४

दुसरा टप्पा

सन          उद्दिष्ट लसीकरण       टक्के

२०१९-२०       ३३२६८  ३५९९५       १०६

२०२०-२१       ३३२६८  ३४५१५         १०४

२०२१-२२       ३३२६८ ३४८४८       १०५

ऑक्टोबर २२    ३३२६८  १९८२५       ६०

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:49 IST

संबंधित बातम्या