बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्र परिसरात सुरू असलेली रस्ते, भूमिगत गटारे आणि पदपथांची कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण करण्याचे आव्हान एमआयडीसी विभागासमोर आहे. औद्योगिक क्षेत्रात रस्ते आणि गटारांसाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले असून अपूर्ण कामांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती आणि चिखल निर्माण होऊन वाहतुकीचा बोजवारा उडण्याची तसेच बंद असलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे त्रासात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे
तारापूर औद्योगिक परिसरातील बोईसर नवापूर या मुख्य रस्त्यावरील मधुर चौक ते टाकी नाका व हिरो शोरूम पर्यंतच्या दोन्ही मार्गिकांचे काँक्रीटीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामासोबतच बाजूच्या भूमिगत गटारांचे देखील काम सुरू करण्यात आले असून पावसाला महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना रस्ते आणि गटारांची बहुसंख्य कामे अपूर्ण असून पावसापूर्वी सुरू असलेली कामे पूर्ण करण्याचे आव्हान एमआयडीसी समोर आहे.
मान्सून हंगामातील पाऊस सुरू झाल्यानंतर अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास होणार असून खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे चिखल निर्माण होऊन काम सुरू असलेल्या रस्त्यांवरील वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर असताना सध्या सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी एमआयडीसीची लगबग सुरू आहे. मात्र काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करताना रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतुकीचा अडथळा ठरत असून सुयोग्य पर्यायी मार्गाची व्यवस्था नसल्यामुळे कामे पूर्ण करताना कंत्राटदाराला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
२२४ कोटींची कामे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काँक्रीट रस्ते, भूमिगत कटारे, दुभाजक आणि पादाचारी यांना ये जा करण्यासाठी पदपथ या कामांसाठी सुमारे २२४ कोटी ३८ लाख ९७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून बिटकॉन-गोवर्धनी तारापूर या ठेकेदार कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदार कंपनीला १४ मार्च २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता मात्र डिसेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ३० महिन्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात रस्ते, गटार व पदपथांची सध्या सुरू असलेली कामे पाऊस सुरू होण्याच्या अगोदर पूर्ण करण्याचे नियोजन असून पावसाळ्यात तीन महिने काम बंद राहणार असून नागरिक व वाहन चालकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे उप अभियंता अविनाश संखे यांनी दिली.
समन्वयाअभावी सिंगल यंत्रणा बंद : तारापूर औद्योगिक परीसरातील नियमित वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण ठिकाणांचे जिल्हा वाहतूक शाखेमार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन वाहतूक सुरळीत राहावी व वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे यासाठी खैरापाडा बिरसा मुंडा चौक, बेटेगाव टाटा हाऊसिंग, नवापुर नाका, मधुर नाका आणि टाकी नाका या पाच ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली.
सुरुवातीला बिरसा मुंडा चौक आणि टाकी नाका येथे वाहतूक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रायोगिक तत्वावर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली होती. यावेळी रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नल यंत्रणेत वेळेच्या नियोजनाचा प्रयोग सुरू होता. मात्र सध्या बोईसर चिल्हार मार्गावरील बिरसा मुंडा चौक येथील सिग्नल सकाळी संध्याकाळी वाहनांच्या गर्दीच्या वेळेस सुरू असून इतर चार ठिकाणचे सिग्नल बंद अवस्थेत आहेत. एमआयडीसी आणि वाहतूक विभाग यांच्यातील समन्वयाअभावी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेसाठी केलेला ४० लाखांचा खर्च वाया गेला आहे.