पालघर : शहरांमधील उंच इमारती, कॉर्पोरेट संकुले आणि रेल्वे स्थानकांच्या काचा तसेच दर्शनी भागांची (फसाड) स्वच्छता आता मानवी जिवाची जोखीम न पत्करता अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाने होणार आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया सरकारने सुरू केलेल्या प्रतिष्ठित ‘व्हिक्टोरिया इंडिया मार्केट मेकर्स डेलिगेशन २०२६’ या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या १० आघाडीच्या नवउद्योजकांमध्ये मूळचे पालघरचे सुपुत्र मिखिल कोटक यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे मिखिल यांच्या ‘फमासो’ (FAMASO) या स्टार्टअप कंपनीला भारतातील गगनचुंबी इमारती आणि पायाभूत सुविधांच्या हवाई स्वच्छतेचा मार्ग खुला झाला आहे.

भारतात मेट्रो शहरे वेगाने आकाशाला गवसणी घालत असून मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांत काचेची आवरणं असलेल्या उत्तुंग इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पारंपारिक पद्धतीमध्ये अशा इमारतींची स्वच्छता करण्यासाठी कामगारांना दोऱ्या (रोप अ‍ॅक्सेस), बांबू अथवा लोखंडी मचान बांधून उंच टांगावे लागते. यामुळे गंभीर अपघातांची शक्यता नेहमीच असते. हीच जोखीम पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मिखिल यांनी ऑस्ट्रेलियात ड्रोन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर सुरू केला. त्यांच्या कंपनीला ऑस्ट्रेलियातील नागरी हवाई वाहतूक सुरक्षा प्राधिकरणाची (CASA) अधिकृत मान्यता मिळाली असून, न्यू साउथ वेल्समधील तब्बल ५१३ इमारतींच्या स्वच्छतेचे जागतिक स्तरावरील मोठे कंत्राट त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

हेच तंत्रज्ञान भारतात व्यावसायिक पातळीवर आणण्यासाठी मिखिल सज्ज झाले आहेत. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर भर देत त्यांनी १०० टक्के भारतातच डिझाइन आणि निर्मिती केलेली विशेष ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये पाण्याच्या विशिष्ट गुणवत्तेसाठी वॉटर प्युरिफिकेशन युनिट, जमिनीवरून नियंत्रित होणारी हाय-प्रेशर यंत्रणा आणि सुरक्षेसाठी रूफ-टेदरिंग प्रणाली समाविष्ट आहे.

भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (DGCA) अधिकृत मंजुरी मिळवून मिखिल यांनी मुंबईतील जेएसडब्ल्यू रिॲल्टीच्या ‘मोरेना हाऊस’वर तसेच ईशान्य रेल्वेच्या स्थानक व डब्यांवर ड्रोन स्वच्छतेची यशस्वी प्रात्यक्षिके दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ऑस्ट्रेलियन सरकारच्या शिष्टमंडळासोबत येत मिखिल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत आहेत. एका मराठी तरुणाने जागतिक व्यासपीठावर तंत्रज्ञानाचा ठसा उमटवून मायदेशात क्रांती घडवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

टिफीन सेवेतील अपयशापासून जागतिक यशापर्यंतची भरारी

मिखिल कोटक यांचा हा प्रवास सोपा नव्हता. १९९७ मध्ये पालघरमधून केवळ स्वप्ने सोबत घेऊन ते मेलबर्नला पोहोचले. उपजीविकेसाठी त्यांनी डबा (टिफिन) पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला, मात्र तो अयशस्वी ठरला आणि बंद पडला. २०११ च्या सुमारास उदरनिर्वाहासाठी त्यांनी एका इमारतीत प्रत्यक्ष खिडक्या स्वच्छ करण्याचे (विंडो क्लिनर) काम सुरू केले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पायलट परवाना व आयटी पदवी मिळवली. २०१३ मध्ये घराच्या गॅरेजमधून सुरू केलेल्या ‘फमासो’चे रूपांतर त्यांनी आघाडीच्या कंपनीत केले. अपयशाने खचून न जाता कामगारांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून आता ते नव्या दिमाखात भारतात परतत आहेत. पालघर (चुनाभट्टी) येथील आनंद वृद्धाश्रमाचे ते संचालक पद भूषवित असून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

कॅटॅलायझर (Catalysr) उपक्रमांतर्ग भरारी

स्थलांतरित उद्योजकांसाठीचा स्टार्टअप इनक्युबेटर ‘कॅटॅलायझर’ (Catalysr) हा ऑस्ट्रेलियातील एक नामांकित स्टार्टअप प्रवेगक (Accelerator) आहे. ऑस्ट्रेलियात स्थलांतरित आणि निर्वासित म्हणून आलेल्या गुणवंत व्यक्तींना (‘मायग्राप्रिन्योर्स’) स्वतःचे स्टार्टअप किंवा सामाजिक व्यवसाय उभे करण्यासाठी ही संस्था मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक प्रशिक्षण देते.

२०१६ पासून सुरू झालेल्या या व्यासपीठाने आतापर्यंत ८७ देशांतील १,३०० हून अधिक स्थलांतरित व्यावसायिकांना बळ दिले असून त्यामध्ये तब्बल ४८ टक्के महिलांचा सहभाग आहे. या उपक्रमातून ३०० हून अधिक यशस्वी व्यवसाय सुरू झाले आहेत. विशेष मार्गदर्शन, नेटवर्क आणि फेलोशिपच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत स्थलांतरितांचे योगदान वाढवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.