वाडा : शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ जुन्या असलेल्या वाडा शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय अशा शासकीय कार्यालयीन इमारतींच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. या दुरुस्तीच्या माध्यमातून ठेकेदार व अधिकारी यांचे उखळ पांढरे होत असल्यामुळेच ही दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे बोलले जात आहे.
वाडा शहरातील तहसीलदार कार्यालय, शासकीय निवासस्थान, पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय या कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम हे ब्रिटिश सरकारच्या कालावधीत झालेले आहे. आज इमारतींना १०० ते १२५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. दगड, चुन्याचा वापर करून बांधलेल्या या इमारतींची बांधकामे आजही मजबूत आहेत. या इमारती कौलारू असल्याने छप्परे नादुरुस्त झाली आहेत. पावसाळय़ात गळती होऊन कार्यालयीन दस्तऐवज भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून या इमारतींची दुरुस्तीची कामे घेतली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सध्या तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाणे या दोन इमारतींच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दोन्ही कार्यालयीन इमारतींना गेल्या काही वर्षांपासून पावसाळय़ात प्लास्टिकचा आधार देऊन येथील गळती थांबविण्यासाठी उपाययोजना केली जात होती. या वेळी या दोन्ही इमारतींवर लोखंडी पत्रे टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. या इमारतींची कायमस्वरूपी दुरुस्ती न करता ठेकेदारांना काम मिळावे यासाठीच ही तात्पुरती दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे बोलले जात आहे.
पुरातन विभागाचा अडथळा
शंभर वर्षांपूर्वी (ब्रिटिश कालावधीत) बांधकाम करण्यात आलेल्या इमारतींचे बांधकाम तोडण्यासाठी पुरातन विभागाची परवानगी घ्यावी लागते. या परवानगीसाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने प्रशासकीय अधिकारी या इमारतींच्या जीर्णोद्धार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे सांगितले जात आहे.
तालुक्यातील विविध विभागांच्या कार्यालयीन नवीन इमारतींचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, निधीची उपलब्धता होताच नवीन इमारतींची कामे हाती घेतली जातील. -अनिल भरसट, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय, वाडा
ब्रिटिश कालावधीत बांधकाम झालेल्या जुन्या इमारती आजही सुस्थितीत आहेत. त्या तोडण्याऐवजी त्याच्यावर आरसीसी छप्पर टाकून जागेचा विस्तार वाढवावा.- ऋषिकेश सावंत, सामाजिक कार्यकर्ता, वाडा