पालघर : पालघर जिल्हा स्थापनेनंतर उभारण्यात आलेल्या जिल्हा मुख्यालय संकुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रसंगी राज्यातील नऊ मंत्री सहभागी होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे.

जिल्हा स्थापने नंतर मुख्यालय उभारणीचे काम सिडकोला देण्यात आले होते. २१ ऑगस्ट २०१७ रोजी कामाला सुरुवात होऊन जुलै २०२१च्या मध्यावर तीन कार्यालयांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले. ६६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा इमारती या संकुलात उभारण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालय एकंदर १०३ हेक्टर क्षेत्रफळावर विकसित होणार असून त्यामध्ये ५९१७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जिल्हा न्यायालयाची उभारणी एप्रिल २०२१ मध्ये सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व इतर काही मंत्री हेलिकॉप्टरने बोईसर येथे उतरून पालघर येथील जिल्हा मुख्यालयाच्या संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. या प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट, जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाला भेट देऊन जिल्हा परिषदेतील काही विकास योजनांबाबत माहिती घेणार आहेत. त्याचबरोबरीने जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, गृहराज्यमंत्री संभूराजे देसाई व महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित राहण्याचे अपेक्षित आहे. करोना पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित ठेवण्यात आले असून वेगवेगळ्या दालनांमध्ये मर्यादित उपस्थितीत कार्यक्रमाची आखणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

पालघर जिल्ह्य़ात अद्याप स्थापित न झालेली कार्यालये

जिल्हा न्यायालय, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, साहाय्यक संचालक (सरकारी अभियोक्ता), सहायक संचालक (कुष्ठरोग), साहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन), कार्यकारी अभियंता (सागरी किनारा सर्वेक्षण),  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, विद्युत निरीक्षक (निरीक्षण विभाग क्र. १), शासकीय तांत्रिक विद्यालय, साहाय्यक ग्रंथालय संचालक, खादी ग्रामोद्योग अधिकारी, कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे), जिल्हा समादेशक (होमगार्ड), कार्यकारी अभियंता (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), उपसंचालक (सामाजिक वनीकरण), सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र,  जिल्हा मृद सर्वेक्षण व परीक्षण अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास व्यवसाय अधिकारी, प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सहा. अधीक्षक (खारभूमी विकास मंडळ), कौटुंबिक न्यायालय, औद्योगीक न्यायालय.

४० जिल्हास्तरीय कार्यालये स्थापन

पालघर जिल्ह्य़ाच्या मुख्यालयात अजूनपर्यंत ४० जिल्हास्तरीय कार्यालये स्थापन झाली असून अजूनही २३ कार्यालयांची स्थापना होणे प्रलंबित आहे. पालघर जिल्ह्यात स्थापित झालेली कार्यालये पुढीलप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक अभियंता कार्यालय, साहाय्यक नगररचनाकार कार्यालय, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद), जिल्हा माहिती कार्यालय, साहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा, जिल्हा नियोजन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपनियंत्रक (नागरी संरक्षण), जिल्हा सांख्यिकी कार्यालय, १५ जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख कार्यालय), अधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.), साहाय्यक आयुक्त (समाज कल्याण विभाग), जिल्हा सामान्य रुग्णालय (जिल्हा शल्य चिकित्सक), वरिष्ठ भूवैज्ञानिक (भूजल सर्वेक्षण), जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था), जिल्हा विशेष लेखापरीक्षण, (साहाय्यक संस्था), उपअधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जिल्हा परिषद), महाव्यवस्थापक (जिल्हा उद्योग केंद्र) सदस्य सचिव व संशोधन अधिकारी (जिल्हा जातपडताळणी समिती), सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, कामगार उपायुक्त (तारापूर), प्रकल्प संचालक (आत्मा), प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षय रोग अधिकारी, उपायुक्त (जिल्हा पशुसंवर्धन) जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय.