जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार; पदोन्नतीचे आश्वासन, पदरात मात्र सेवानिवृती

वाडा व तलासरी तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षक निवृत्तीच्या वाटेवर असताना पालघर जिल्हा परिषदेने त्यांची विस्तार अधिकारी पदासाठी निवड केली.

जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार; पदोन्नतीचे आश्वासन, पदरात मात्र सेवानिवृती

वाडा: वाडा व तलासरी तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षक निवृत्तीच्या वाटेवर असताना पालघर जिल्हा परिषदेने त्यांची विस्तार अधिकारी पदासाठी निवड केली. मात्र दोन महिने लोटले तरी विस्तार अधिकारी पदाचे आदेश आले नाहीत. आता ३१ मे रोजी या दोन्ही शिक्षकांची सेवानिवृत्ती झाली. पण पदोन्नतीचे गाजर काही पदरी पडलेले नाही. जिल्हा परिषदेच्या या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यातील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती यादी रिक्त पदानुसार तयार करण्यात आली. अशा शिक्षकांचे समुपदेशन मुलाखतीद्वारे करण्यात आले. त्यानंतर २१ मार्च २०२२ रोजी प्रक्रिया पूर्ण करून अंतिम २२ शिक्षकांची पदोन्नती यादी तयार करण्यात आली.

हे शिक्षक पदोन्नती आदेश मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना, यातील दोन शिक्षक जयवंत काकड (तलासरी) व बाळकृष्ण तांडेल (वाडा) हे ३१ मे २०२२ला सेवानिवृत्तही झाले आहेत, परंतु अद्याप पदोन्नती आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. याबाबत चौकशी केली असता समजले की, समुपदेशन २१ मार्च २०२२ रोजी घेतल्यानंतर ५ एप्रिल २०२२ रोजी मंत्रालयातून मार्गदर्शन मागवण्यात आले. सन १३/१४ तील अध्यादेशाच्या मूळ प्रती सापडत नसल्याचे मंत्रालयातून समजले. आयुक्तांकडून होकार असल्याने ही पदोन्नती करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात हे प्रकरण न्यायालयात गेले व सर्व प्रक्रिया थांबली. आता प्रक्रिया पूर्ण झाली आहे, विस्तार अधिकारी पदोन्नतीचे आदेश मिळालेच पाहिजेत यावर निवड झालेले शिक्षक आजही ठाम आहेत.

पालघर जिल्ह्यात ९७ केंद्रप्रमुख व ६० विस्तार अधिकारी पदे रिक्त असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेने घाईगडबडीत घेतलेल्या प्रक्रियेमुळे पदोन्नतीसाठी निवड झालेले उमेदवार निराश झाले आहेत. आपल्यालाही पदोन्नतीचे आश्वासनच मिळते की खरोखरच पदोन्नती मिळते, याबाबत ते संभ्रमात आहेत.

पदोन्नतीला विलंब का झाला? याबाबत अधिक तपशील घेण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या प्रभारी शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु समुपदेशन व वाडा गटशिक्षण अधिकारी जयवंत खोत म्हणाल्या की, समुपदेशन व भरती प्रक्रिया हा विषय जिल्हा परिषद अखत्यारीत असल्याने त्याबाबत मला काहीही सांगता येणार नाही.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दंश उपचारांसाठी प्रशासन सज्ज; गतवर्षी २० हजार नागरिकांना श्वानदंश तर ४१८२ जणांना सर्पदंश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी