पालघर : सोन्या -चांदीच्या दागिन्यांसाठी लागणारे साचे बनविणाऱ्या व्यावसायिकांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दागिन्यांच्या साच्यासाठी चिंचणी हे माहेरघर ओळखले जाते. चिंचणी गावात विजेच्या कमी-अधिक दाबामुळे हे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. कमी-अधिक दाबाच्या कारणांमुळे विद्युत उपकरणे जळाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून चिंचणी-वाणगाव परिसरात विजेचा अनियमित दबाव सुरूच आहे. संपूर्ण भारतभर या परिसरातून सोन्या चांदीचे विविध दागिने घडविणारे साचे पाठवले जातात. साच्यांचे उत्पादन लक्षणीय आहे. असे असताना विजेच्या खेळ खंडोब्यामुळे डाय उत्पादन करणारे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. व्यावसायिकांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार कल्पना व तक्रारी दिल्यानंतरही त्यावर कुठल्याही प्रकारचे निवारण झालेले नाही. याउलट विजेचा खेळ खंडोबा सुरूच आहे.
विजेच्या या समस्येमुळे उत्पादनकामी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारी चालत नाहीत. साचे घासण्यासाठी या मोटारींचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो. मात्र त्या बंद राहात असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. याचबरोबर रोजच्या वापरातल्या पाण्याचे पंपही चालत नसल्याने पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय या व्यवसायात विजेवर आधारित उपकरणे म्हणजेच लाखो रुपयांचे वायरकट आणि सीएनसी ही मशिन्स अनियमित दबावामुळे जळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूरदर्शनसंच, फ्रीज, पंखे, मिक्सर, लाइट आदी जळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. कडक उन्हाळय़ाच्या दिवसात कुलर, पंखे असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू म्हणून राहिले आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मागील सहा महिन्यांपासून उद्भवलेली समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
५० वर्षांच्या जुन्या विद्युत वाहिन्या
या परिसरात १९६३ साली विद्युत वाहिन्यांची बदली करण्यात आली होती असे समजते. त्यानंतर त्यांची देखभाल दुरुस्ती सुरू आहे समुद्रकिनाऱ्यालगत हा परिसर असल्यामुळे विजेचे खांब तारा दुरावस्थेत सापडत आहे या ठिकाणी भूमिगत वीजवाहिनी टाकणे आवश्यक असल्याची बाब अनेक वेळा समोर आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या भागात वाऱ्या-पावसात अनवधानाने जर विद्युत प्रवाह वाहून नेणारी वाहिनी तुटली तर तेथे या वाहिनीला त्याच तारेच्या साह्याने पुन्हा जोडून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला जात आहे, परंतु इतक्या वर्षांचा कालावधी उलटून गेला. आजतयागत या तुटलेल्या विद्युत वाहिन्यांची कुठल्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. सुमारे पन्नास वर्ष जुन्या विद्युत वाहिन्या तशाच आहेत.