पालघर: माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने पर्यटक आणि भाविकांसाठी ‘कोकण दर्शन’ पॅकेज टूरची विशेष पर्वणी आणली आहे. पालघर जिल्हयातील भाविकांना कोकणातील प्रसिद्ध देवस्थाने आणि ऐतिहासिक किल्ल्यांची सफर घडवून आणण्यासाठी हे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या सवलतींचा पूर्ण लाभ मिळणार आहे.
पालघर एसटी प्रशासनाने हे नियोजन केले असून पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा अशा आठही आगारातून कोकण दर्शनाकरिता या बस निघणार आहेत. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही आगारातून ४० प्रवाशांचा गट तयार झाल्यास, त्यांच्यासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने दर्शवली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांना आपल्या जवळच्या आगारातून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
ही सहल निसर्गरम्य कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटन स्थळांना भेट देणार आहे. यामध्ये ऐतिहासिक दुर्गभ्रमंती मध्ये मुरुड जंजिरा किल्ला आणि रायगड किल्ल्याचा समावेश आहे. यासह संगमेश्वर, मार्लेश्वर (गुहेतील शिवमंदिर) आणि प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित आगारातून सुटणाऱ्या बसचा मार्ग मुरुड जंजिरा – माणगाव – रायगड – संगमेश्वर – मार्लेश्वर – गणपतीपुळे आणि परतीचा प्रवास असा असणार आहे.
अल्प दरात प्रवास आणि सवलतींचा पाऊस
या पॅकेज टूरसाठी ग्रुप बुकिंग असूनही शासनाच्या सर्व सवलती लागू आहेत. यामध्ये ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील) १०० टक्के मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना (६५ ते ७५ वर्षे) नियमानुसार ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सोयीनुसार नियोजन
येत्या २२ जानेवारी रोजी गणेश जयंती आहे, त्या पार्श्वभूमीवर भाविकांना गणपतीपुळे येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी हे नियोजन आहे. या सहलीसाठी कोणताही ठराविक कालावधी बंधनकारक नसून, प्रवाशांच्या मागणीनुसार तारीख आणि वेळ ठरवली जाणार आहे. तसेच, प्रतिसाद मिळाल्यास आगामी काळात ‘अष्टविनायक दर्शन’ पॅकेज टूर देखील पालघर विभागामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि स्वस्त दरात सेवा देणे हे एसटीचे कर्तव्य आहे. ४० प्रवासी एकत्र आल्यास आम्ही त्यांच्या सोयीनुसार बस सोडू शकतो. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. – कैलास पाटील, विभाग नियंत्रक, पालघर विभाग
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क
सहलीच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी पालघर आगारातील आगार व्यवस्थापक: ८८८८६६१६६८, स्थानक प्रमुख: ८२०८६८३६६३ यांच्याशी या क्रमांकावर किंवा आपल्या नजीकच्या एसटी स्थानक प्रमुखांशी संपर्क साधावा.
कोकणदर्शन दौरा शुल्क
आगार – पुरुष – सवलदार (योजना)
वसई – २०११ – १००६
नालासोपारा – २०११ – १००६
अर्नाळा – २०७१ – १०३६
पालघर – २४४५ – १२२३
बोईसर – २४६५ – १२३३
जव्हार – २४६२ – १२३१
सफाळे – २४२५ – १२१३
डहाणू – २५१५ – १२५८
