डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई वाहिनीवर चिंचपाडा हद्दीत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका भीषण अपघाताची घटना घडली. १७ प्रवाशांना घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलर गाडीचा मागचा टायर अचानक फुटल्याने चालकाने वाहन हळू केले. याच दरम्यान मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलरने ट्रॅव्हलरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधील बिलीमोरा येथील लाड कुटुंबीय आपल्या मुलीला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

या अपघातात पुष्पाबेन लाड (६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नैनाबेन लाड (५२), टिंकल लाड (२९), जगदीश लाड (५१), हार्दिक लाड (३१), धवल लाड (३२), विकी प्रजापती (२७), त्रिशा लाड (१५), जय लाड (२०), जयेश प्रजापती (५०), प्रवीण लाड (६२), गीता प्रजापती (५०), तेजल प्रजापती (२५), श्याम लाड (२९), कवण लाड (दीड वर्ष), दर्शन लाड (२९) हे सर्व जखमी झाले आहेत. अनेकांना डोक्याला, हात-पायांना जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस आणि मनोर महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य करत सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या काहींना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी आणि गुजरात येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.