मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जकात नाका, टोल नाका तसेच इतर चौकांमध्ये पोलिसांचे पथक तपासणीसाठी तत्पर असल्याचे दिसून येत असताना प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी करणे व परराज्यातील वाहनांवर कारवाई करणे हिच त्यांच्याकडून प्रामुख्याने कारवाई होत आहे. मात्र महामार्गावर मार्गिका व वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने महामार्गावर जवळपास दररोज अपघात होत असून गेल्या पाच वर्षात ४५० प्रवाशांना प्राण गमवावे लागले लागले आहेत. या महामार्गावरील वेगवान वाहतूक, अपुऱ्या सुरक्षा उपायोजना व अपघातप्रवण क्षेत्र दुर्लक्षित राहिल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
गेल्या आठवड्यात धानिवरी (डहाणू) येथे १४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू होणं हा या महामार्गावरील अलीकडच्या काळात सर्वात भीषण अपघात ठरला आहे. ही घटना केवळ अपघात नसून अपुऱ्या पायाभूत सुविधा व प्रशासकीय निष्काळजीपणाचे फलित आहे. पर्पल कंपनीच्या प्रवासी बसने २९ जानेवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऑईल टँकरला कुडे-हालोली (पालघर) जवळ दिलेल्या धडकेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमटा येथील अपघात प्रवण वळणावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या टँकर वाहनाने मार्गीका ओलांडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी बसला धडक दिल्याने प्रवाशांचा मृत्यू झाला होता. नंतर ४ सप्टेंबर २०१४ उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे हा महामार्ग चर्चेत राहिला होता. भीषण अपघात झाल्यानंतर काही दिवस यंत्रणा सतर्क होऊन कारवाई करत असली तरीही नंतर काही दिवसांनी परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गाची तसेच रुंदीकरण प्रकल्पाची उभारणी करताना भूसंपादन करण्यात आले होते. असे करताना स्थानिकांसाठी व स्थानिक गावपाड्यांच्या जोडणीसाठी सेवा रस्त्यांची उभारणी करणे प्रलंबित राहिले आहे. चारोटी ते विवळवेढे (श्री महालक्ष्मी मंदिर) पर्यंत अशा सेवा रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना दरवर्षी यात्रेच्या दरम्यान या पट्ट्यात भीषण अपघात होतानाचे दिसून आले आहे. हे प्रशासनाचे निष्काळजीपणाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. त्याचप्रमाणे इतर महामार्गांवर अवजड वाहनांसाठी ट्रक बे अर्थात अवजड वाहनांच्या विश्रांतीसाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याचे प्रमाण वर्सोवा (घोडबंदर) ते तलासरी दरम्यान कमी प्रमाणात असल्याचे आरोप होत आहेत. याच बरोबरीने महामार्ग लगतच्या गावांमधील रहिवासी दुचाकीवर प्रवास करत असल्याने महामार्गाच्या मार्गीके लगत दुचाकी स्वार यासाठी स्वतंत्र तीन- चार फुटांची मार्गिका उभारण्यात देखील महामार्ग प्राधिकरणाला अपयश आले आहे.
महामार्ग पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे तपासणी केली जात असली तरी अधिकतर तपासणी ही कागदोपत्री पूर्तता करण्याच्या दृष्टीने दिसून येते. पालघर पोलिसांकडे वेग मर्यादेवर नियंत्रण राखण्यासाठी स्पीडगन यंत्रणा कार्यान्वित असली तरी या गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने अवजड वाहतूक करणाऱ्यांना राज्यातील १२१ किलोमीटर पट्ट्यातील बेफाम गाडी चालवण्याची मुभा मिळते. हे पाहता वेगवान वाहतूक व अवजड वाहनांची बेदरकार धाव हे अपघाताचे प्रमुख कारण मानले जात आहे.
गुजरात राज्यामध्ये मार्गिका शिस्त पाळणारी अवजड वाहने राज्यात प्रवेश केल्यावर त्यांचे राजरोसपणे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे हलक्या व इतर वाहनांना ओव्हरटेक करताना उजव्या ऐवजी डाव्या बाजूने ओव्हरटेक करावे लागते. अशावेळी महामार्गावर साईडपट्टी योग्य नसते, महामार्ग लगत वाहने पार्किंग करून उभी ठेवली असल्यास किंवा वाहनांचा वेग जलद असल्यास अपघात होताना दिसून येतात. राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीट करण्याचे काम सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी झाल्यास अनेकदा वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गीकेवरून प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी त्यांना रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असल्याने अनेकदा अपघात होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.
वेग मर्यादा नियंत्रित ठेवण्यासाठी परिवहन विभागातर्फे स्वयंचलित वाहनांचा वेग तपासून वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणारी यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही यंत्रणा वर्षाअखेरीस कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्यानंतर काही प्रमाणात वाहन चालकांच्या बेशिस्तीवर नियंत्रण येईल अशी अपेक्षा आहे. असे स्वयंचलित कारवाई करणारे कॅमेरे अधिकाधिक ठिकाणी बसविण्यात आल्यास वाहतूक नियमांशी संबंधित अनेक समस्यांवर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. गुजरात मधून राज्यात प्रवेश केल्यानंतर सीमालगतच्या भागात तसेच तलासरी तालुक्यात अनेक ठिकाणी वाहन चालक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ताडी – माडी दुकान, तसेच बिअर शॉपी मधून मद्यपान करत असल्याचे दिसून आले आहे. मद्यधुंद वाहन चालकांमुळे होणारे अपघाताची संख्या लक्षणीय आहे.
वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणे हे रोजरोस पणे घडत आहे. लग्न समारंभ, कामासाठी जाणाऱ्या कामगारांची वाहतूक, शालेय विद्याथ्यांसाठी असणारी वाहन सुविधा, तसेच सार्वजनिक वाहतूक करणारे वडाप व तत्सम व्यवस्थे मध्ये मंजूर क्षमते पेक्षा अधिक प्रवासी बसविले जात असून यावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासकीय व्यवस्था अपयशी ठरली आहे. मालवाहू वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणे तसेच गौण खनिज व इतर वस्तूंची वाहतूक करताना (ओवरलोड) अधिक क्षमतेने मालवाहतूक केली जात असून यामुळे वाहनांचे नियंत्रण शोधून अपघात होण्याचे प्रकार देखील घडले आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलीस व इतर यंत्रणेने एकत्रित अभ्यास करून अपघात प्रवण क्षेत्रांची यादी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दिली होती. अपघात प्रवणक्षेत्र कमी करण्याच्या दृष्टीने रंबलर बसवणे, अपघात प्रवणक्षेत्र व वेग मर्यादा दर्शवणारे फलक बसविणे, वळण असणाऱ्या क्षेत्रात रिफ्लेक्टर बसवणे, उड्डाणपूलांवर प्रकाश यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच इतर बाबींची पूर्तता केली आहे. मात्र वेगवेगळ्या मर्यादा व तांत्रिक कारणांमुळे उभारणीत दोष असणारे अपघात प्रवण क्षेत्र अजूनही या महामार्गावर कायम राहिले आहेत. टोल असणारा या महामार्गावर तांत्रिक दोषांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्राधान्य द्यायला हवे मात्र लोकप्रतिनिधींकडून या दृष्टीने पाठपुरावा होत असताना देखील प्रत्यक्षात त्याविषयी विशेष काही होताना दिसून येत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अपुऱ्या उपाययोजना व यंत्रणेची निष्काळजीपणा हे देखील महामार्गावरील अपघाताचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे.
अपघातांच्या ठिकाणी रुग्णवाहिका, क्रेन हायड्रा व अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यासाठी अजूनही यंत्रणेत असणाऱ्या मर्यादा दिसून आल्या असून पुढील काही महिन्यात मनोर येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाल्यानंतर अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होत असून वेग मर्यादा राखणे, मार्गिका शिस्त व नियमांचे पालन करणे तसेच या मार्गावर असणारे तांत्रिक दोष दूर होईपर्यंत हा महामार्ग वाहन चालकांसाठी घातक ठरत आहे.
