डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाणपुलावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामामुळे पुलावरील दोनही वाहिनीवरील प्रत्येकी २ मार्गिका बंद ठेवल्यामुळे वाहने सेवा रस्त्यावरून प्रवास करत आहेत. यामुळे सध्या चारोटी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून मुंबई आणि गुजरात वाहिनीवर साधारण ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चारोटी येथील उड्डाणपुलावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामामुळे सध्या पुलावरील दोन वाहिन्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवसी मोठ्या प्रमाणात महामार्गावरून प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सध्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून उड्डाणपुलावरून दोन वाहिन्या बंद असल्यामुळे वाहने सेवा रस्त्यावरून प्रवास करत असून यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस सकाळपासून रस्त्यावर उतरले असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्यामुळे स्थानिक पातळीवरील वाहतूक विस्कळीत झाली असून स्थानिक बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ahmedabad national highway traffic congestion charoti flyover ssb