पालघर: कोणत्याही रस्त्यापासून सुरूंग स्फोट अंतर्भाव असणाऱ्या गौण खनिज उत्खनन २०० मीटर पर्यंत करण्यास शासनाने प्रतिबंध घातले असताना त्याचे उल्लंघन करून पालघर तालुक्यात मुंबई- बडोदा द्रुतगती मार्गाच्या लगत किमान पाच-सहा ठिकाणी राजरोसपणे गौण खनिज उत्खनन सुरू आहे. त्यापैकी काही ठिकाणी पारंपारिक नियंत्रित ब्लास्टिंग पद्धती ऐवजी बोरवेल बास्टिंग पद्धत वापरली जात असल्याने द्रुतगती मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत खनिकर्म तसेच महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
मुंबई बडोदा द्रुतगती मार्गाचा गंजाड त पेणंद दरम्यान चा टप्पा जवळपास पूर्ण झाला असून पेणंद सोनावे दरम्यान पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून भिवंडी पर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. पालघर तालुक्यात किराट येथे पाच, लालोंडे व नागझरी येथे प्रत्येकी किमान सहा खदानी सध्या कार्यरत आहेत.
महसूल व वनविभागाने खान व खनिज अधिनियम अंतर्गत १९ ऑगस्ट २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत रेल्वे मार्ग, जलाशय, कालवा, रस्ता, नदी, नाला, पाटबंधारेची काम किंवा सार्वजनिक बांधकाम किंवा इमारती पासून लेखी परवानगी घेऊन सुरुंग स्फोटाचा अंतर्भाव असणाऱ्या खाणकामे २०० मीटर पेक्षा कमी अंतरावर परवानगी देण्यात येऊ नये असे सुचित करण्यात आले होते.
मात्र किराट येथील गट क्रमांक ३०५, ३१०, ३४८, ३५० येथे काही खाजगी गौण खनिज व्यवसायिक व काही कंपन्यांनी राजरोसपणे खाणकाम मुंबई बडोदा दृतगती मार्गाच्या लगत गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. या खाणकामात राजकीय हितसंबंध असल्याने जिल्हा खनीकर्म विभाग तसेच महसूल विभागाने त्याविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे इतर व्यवसायिकांकडून आरोप होत आहेत. या द्रुतगती मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यास या खदानीमुळे जमिनीमध्ये निर्माण होणाऱ्या कंपामुळे महामार्गाच्या पृष्ठभागावर तडा पडणे किंवा काही प्रमाणात भराव खचण्याची क्रिया होऊन सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वर्तविले जात आहे.
या संदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रमुख रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर कोणत्याही खदानी मधून सुरुंग स्फोटाद्वारे उत्खनन करण्यास प्रतिबंधित असल्याचे सांगून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संबंधित ठिकाणी पुन्हा नव्याने तपासणी केली जाईल असे लोकसत्ता ला सांगितले.
नियंत्रित सुरुंग स्फोटां ऐवजी बोर ब्लास्टिंग पद्धत
सर्वसाधारणपणे नियंत्रित पद्धतीने सुरुंग स्फोट घडवताना ट्रॅक्टर मार्फत चालवल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसर द्वारे दगडामध्ये एक इंच व्यासाचे छिद्र पाच ते सात फुटापर्यंत केले जाते. त्यामध्ये तीन कांड्या व एक डिटॉनिटर (कॅप) चा वापर होऊन अशा ५०-७० छिद्र मालिकांद्वारे नियंत्रित स्फोट घडवून खडकामधून सुमारे हजार टन वजनाचे दगड उत्पादन केले जाते. या स्फोटांसाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिन कांड्या या सरासरी ७० ते ८० ग्रॅम वजनाचे असल्याचे सांगण्यात येते.
मात्र अलीकडच्या काळात किराट गावांमध्ये मिनी बोअर मशीन द्वारे कुपनलिका खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राचा वापर करून चार ते १० इंच व्यासाचे मोठे छिद्र दगडामध्ये १० ते ७५ फूट खोलीवर करून त्यामध्ये एक किलो पेक्षा अधिक वजनाच्या जिलेटिन कांड्या या छिद्र पोकळीत टाकून स्फोट घडून आणण्याचे तंत्र वापरण्यात आले होते. पारंपरिक नियंत्रित सुरुंग स्फोटामध्ये दगड २० ते ३० फूट अंतरावर विखुरला जात असताना बोर ब्लास्टिंग पद्धतीमध्ये हादरे ३०० मीटर पलीकडे जाणवले जात असल्याने तसेच दगड मोठ्या प्रमाणात विखुरले जात असल्याचे दिसून आले. परिसरातील घरांना व वस्तुंना धोका पोहोचल्यास शक्यतेने ग्रामस्थांनी एकत्रित होऊन या बोर ब्लास्टिंग पद्धतीला विरोध दर्शवला व काही ठिकाणी हे प्रकार बंद पाडले.
बोर ब्लास्टिंग संदर्भात जिल्हा खनीकर्म विभागाशी संपर्क साधला असता दगडाची प्रत जाणून घेण्यासाठी तसेच अभ्यासासाठी हे तंत्र क्वचितच वापरले जात असल्याचे सांगून आपल्या विभागाला अशा पद्धतीने सुरुंग स्फोट करून गौण खनिज निर्मिती होत असल्याचे माहिती नाही असे त्यांनी सांगितले. या पद्धतीला शासनाची मान्यता नसल्याचे सांगून तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
