बोईसर : मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यात सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिल्लक काम पूर्ण करून पुढील सहा महिन्यात महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. द्रुतगती महामार्गावरून वाहतूक सुरु झाल्यानंतर जुन्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा फार कमी होऊन खाजगी, प्रवासी आणि मालवाहू वाहनांचा प्रवास विना अडथळा जलद होण्याचा दावा केला जात आहे.
मुंबई (जेएनपीटी) ते बडोदा या शहरांना जोडणाऱ्या तसेच दिल्ली मुंबई द्रुततगती महामार्गाचा भाग असलेल्या मुंबई बडोदा वृत्तपती महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालघर जिल्ह्यातील काशीद कोपर ते तलासरी पर्यंत या द्रुतगती महामार्गाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून २०२६ च्या मे महिन्यापर्यंत संपूर्ण १०० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत ठेवण्यात आले आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामामार्गाचा भाग असलेला मुंबई (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) ते बडोदा या दोन मोठ्या शहरांना जोडणार्या ३७९ किमी लांबीच्या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. आठ पदरी द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील एकूण अंतर ७८ किमी असून वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ५१ गावांतून हा द्रुतगती महामार्ग जात आहे. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील काम एकूण तीन विभागांमध्ये सुरू आहे. यातील तलासरी ते गंजाड पर्यंत २६ किमीचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. तर गंजाड ते मासवण पर्यंत २६ किमी आणि मासवण ते काशीद कोपर पर्यंत २७ किमीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
द्रुतगती महामार्गामुळे प्रवास होणार वेगवान :
मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ताशी १२० किमी वेगाने वाहने धावणार आहेत. या द्रुतगती महामार्गामुळे ठाणे आणि नवी मुंबईच्या बाहेरून प्रवासी आणि मालवाहू वाहने थेट विना अडथळा रायगड जिल्ह्यातील जेएनपीटी बंदरापर्यंत जलदगतीने पोचून व्यापारास चालना मिळणार आहे. त्याचबरोबर घोडबंदर रोड, ठाणे शहर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, शिळ फाटा आणि नवी मुंबई ते पनवेल या भागात अवजड वाहनांमुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मासवन ते काशीद कोपर टप्पा आव्हानात्मक :
मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गावरील मासवण ते काशीद कोपर हा २७ किलोमीटरचा टप्पा बांधकामासाठी सर्वात आव्हानात्मक ठरला आहे. या टप्प्यात वैतरणा नदीवरील तीन मोठ्या पुलांच्या कामाचा समावेश असून बहाडोली आणि वैतरणा खाडीवरील वाढीव बेटाजवळील दोन पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पारगाव सोनावे येथील वैतरणा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण स्थितीत आहे.
