बोईसर:  मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाला  तलासरी आंतरबदल मार्गाजवळ तात्पुरती जोडणी देण्यात येत आहे. आंतरबदल मार्गाचे काम रखडल्याने तलासरी ते विरार टप्पा लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात  रस्ते जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या  पालघर जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या तलासरी ते गंजाड (पॅकेज ११), गंजाड ते मासवन (पॅकेज १२) या दोन टप्प्यांचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, तर मासवन ते विरार ( पॅकेज १३) मधील वैतरणा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करून डिसेंबर २०२६ पर्यंत तलासरी ते विरार पर्यंतचा  ८१ किमीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन आहे. मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग तलासरी जवळ ज्या ठिकाणी छेदत आहे त्या ठिकाणी आंतर बदल (इंटरचेंज) मार्गाचे काम रखडले आहे. तलासरी आंतरबदल मार्ग पॅकेज १० मध्ये  समाविष्ट असून रोडवेज सोल्युशन कंत्राटदार कंपनीकडून कामाची  संथगती आणि इतर अडथळ्यांमुळे आंतरबदल मार्गाचे काम अपूर्ण राहिले आहे.

तलासरी ते विरार टप्प्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, मात्र  केवळ तलासरी आंतरबदल मार्ग आणि वैतरणा नदीवरील पुलाचे काम रखडल्यामुळे गुजरात बाजूकडून विरार दिशेला जाणाऱ्या आणि विरार बाजूकडून गुजरात दिशेला येणाऱ्या वाहनांना द्रुतगती महामार्गावर प्रवेश आणि बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या अडचणीवर उपाय म्हणून महामार्गावर वाहनांना प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी तात्पुरता प्रवेश मार्ग तयार करण्यात येत आहे.

वैतरणा नदीवरील पुलाच्या कामाला वेग :

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गावरील मासवण  ते विरार (पॅकेज १३) दरम्यान वैतरणा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे बांधकाम  रखडले होते.  सध्या मात्र पुलाच्या कामाला वेग आला आहे. नदीपात्रातील पुलाची पाया भरणी आणि खांबांचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यावर गर्डर आणि डेक स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. नोव्हेंबर मध्यापर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. तलासरी येथील तात्पुरता प्रवेश मार्ग आणि वैतरणा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांना द्रुतगती मार्गाच्या पालघर जिल्ह्यातील तलासरी ते विरार टप्प्याचा वापर करता येऊ शकेल . यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी ते शिरसाड पर्यंतचा वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होईल.

विरार ते बदलापूर स्पर मार्गाचे काम अंतिम टप्प्यात :

विरार ते जेएनपीटी स्पर मार्गामधील बदलापूर पर्यंत ८० किमी टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विरार, अकलोली, कल्याण आणि बदलापूर येथे इंटरचेंजचे काम पूर्ण झाले आहे. तर वडपे येथील साईधारा इंटरचेंजचे काम प्रगतीपथावर असून अकलोली ते वडपे दरम्यान पुंडास आणि रायते ते बदलापूर दरम्यान दोन ठिकाणी महापारेषण कंपनीचे विद्युत मनोरे स्थलांतरित करण्याचे काम शिल्लक आहे. शेवटच्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर  दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग दरम्यानची वाहतूक अगदी विनाअडथळा आणि जलद होणार असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई बडोदा एक्सप्रेसवे च्या पॅकेज १० मध्ये तलासरी इंटरचेंज समाविष्ट असून हा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वापी विभाग यांच्या अंतर्गत येतो. वैतरणा नदीवरील पुलाचे काम  सुरू असून विरार बाजूकडील वाहिनीचे काम सुरुवातीला प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत पुलाचे काम पूर्ण करून डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत तलासरी ते विरार हा टप्पा वाहतुकीकरिता सुरू करण्याचे नियोजन आहे. – सुहास चिटणीसप्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठाणे विभाग

Live Updates
10:49 (IST) 27 Aug 2026

'आधार' कायद्यात सुधारणा आवश्यक ! उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश; नागरिकत्व मिळवण्यासाठी घुसखोरांकडून आधारच्या बनावट वापराची डंख

सुरक्षा प्रणाली आणि ओळखीला मोठा धोका; बनावट कागदपत्रे वापरणाऱ्या घुसखोरांचा शोध घेऊन तात्काळ हद्दपार करा ...वाचा सविस्तर