पालघर : आदिवासी शिक्षक पात्र उमेदवार भरती करा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनावर बसलेल्या आदिवासी उमेदवारांना आश्वासने दिल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत प्रतिसाद न दिल्याने उमेदवारांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ मुंडन आंदोलन सुरू केले आहे. मुंडन आंदोलन केल्यानंतर केसांची भेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली जाणार आहे,त्यानंतरही आमच्या मागण्यांवर गांभीर्याने लक्ष न दिल्यास शुक्रवारी महिला उमेदवार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बांगड्या भेट देणार आहेत असे उमेदवारांच्या कृती समितीने म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यातील शिक्षक पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया तात्काळ राबविली जाईल अशी आश्वासने दिलेल्या प्रशासन व अधिकाऱ्यांविरोधात शेकडो शिक्षक भरती पात्र उमेदवारांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आश्वासनांच्या 40 दिवसानंतरही भरती संदर्भात पुढील कार्यवाही होत नसल्यामुळे हे आंदोलन करीत असल्याचे कृती समितीने म्हटले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्थी करून शिक्षण विभागाने तातडीने या उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे आदेश दिल्यानंतरही ते पाळले न गेल्यामुळे सुमारे तीनशे आदिवासी उमेदवारांनी मंगळवारपासून हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे.आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, सीईओ साहेब होश मे आव होश मे आव अशा घोषणाबाजी करून उमेदवारांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे.