पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेली अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) विविध उपाययोजनांद्वारे कमी केल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. मात्र ही प्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी त्यांनी लढवलेली नामी शक्कल डोळय़ांत धूळफेक करणारी असल्याचा आरोप केला जात आहे.

महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या किलोमीटरचे अंतर दर्शवणाऱ्या मैलाच्या दगडावर असलेले अंतर व तिथेच लावलेला फलक यांमधील अंतर वाढवून अपघात प्रवण क्षेत्र मिटवण्याचा प्रकार महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. २०१५ मध्ये एका वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार आच्छाड ते दहिसर या ११८ कि.मी. अंतरामध्ये विविध सुमारे ८२ अपघात प्रवण क्षेत्रे होती. उपाययोजना करून ती ५६ करण्यात आली होती आणि आताच्या माहितीनुसार शिरसाड ते आच्छाद या भागात २६ अपघात प्रवण क्षेत्रे असल्याचे प्राधिकरण सांगत आहे. मात्र प्राधिकरणाने दिलेला हा आकडा फसवा असल्याचा आरोप अलीकडेच झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत करण्यात होता. समितीचे अध्यक्ष खासदार राजेंद्र गावित यांच्यासमोर प्राधिकरणाने केलेला दावा महामार्गाशी निगडित असलेल्या काही संघटनांनी पुराव्यानिशी दाखवून दिला व प्राधिकरणाचे पितळ उघडे पाडले.

महामार्गावर अहमदाबादकडे जाताना चारोटी परिसरात गुलझारी नाला येथे अंतर दर्शविणाऱ्या ४८ क्रमांकाच्या दगडावर अहमदाबादचे अंतर ४१९ कि.मी. दर्शविण्यात आले आहे. तेथेच असलेल्या एका फलकावर हे अंतर सुमारे ४१८ दर्शविण्यात आले आहे. याचाच अर्थ पूर्वी या भागात अपघात घडताना फलक असलेल्या ४१८ कि.मी.ची नोंद व्हायची. मात्र आता अपघात घडल्यास ४१९ कि.मी.ची नोंद केली जाते. म्हणजेच नवीन नोंद निर्माण केली जाते. प्रत्यक्षात दगड असलेले ठिकाण हे ४१८ असताना त्यावर ४१९ची नोंद करून अपघात प्रवण क्षेत्र लपवण्यासाठी दिशाभूल केली जात आहे. ज्या ठिकाणी ४१८ चे अंतर आहे त्या ठिकाणी ४१९ चा दगड आला कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गावर असे प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात.

चारोटी उड्डाणपूल व एशियन पेट्रोल पंप येथे गेल्या तीन वर्षांत झालेले अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक यांची संख्या लक्षात घेता हे दोन वेगवेगळे अपघात प्रवण क्षेत्र जाहीर करणे आवश्यक होते. तसे न करता ते एकत्रित करून एकच अपघात प्रवण क्षेत्र जाहीर केले गेले व एक प्रवण क्षेत्र संख्या लपवण्याची शक्कल लढवली गेली.

अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी दाखवण्याची शक्कल

प्रत्यक्षात अपघात प्रवण क्षेत्रामध्ये ५०० मीटर अंतराच्या परिघात तीन वर्षांत पाचपेक्षा कमी किंवा अधिक अपघातात १० जण मृत्युमुखी पडले असतील तर त्याला अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) जाहीर केले जाते. महामार्गावर अशा ठिकाणी दोन्ही वाहिनीच्या अडीचशे मीटरचा परीघ ते क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते. ते क्षेत्र सुरू होताना व संपताना दोन्ही बाजूला फलक लावणे अपेक्षित आहे. प्राधिकरणाचा २६ क्षेत्रांचा दावा असला तरी ५२ फलक महामार्गावर दिसून येत नाहीत. अशा अनेक नामी शकली लढवून महामार्ग प्राधिकरण अपघात प्रवण क्षेत्र लपवण्याची किमया साधत असल्याचे आरोप झाले आहेत. अशा अनेक शकला लढवून आतापर्यंत अनेक अपघात प्रवण क्षेत्र कमी केल्याचे सांगितले जात आहे.

शक्कल लढवून सुरू केलेला प्रकार चुकीचा आहे. प्रवण क्षेत्र लपवू शकता, पण प्रत्यक्षात ते कमी करू शकत नाहीत. प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी आलेला निधी प्रत्यक्षात खर्च करून उपाययोजनेतून प्रवण क्षेत्र कमी करणे आवश्यक आहे.  –  हरबन्स नन्नाडे, प्रतिनिधी, अखिल भारतीय वाहन चालक मालक संघ

जिल्हाध्यक्षपदासाठी चढाओढ

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पालघर जिल्हा शिवसेनेत मोठय़ा प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न करीत आहेत. जिल्हाप्रमुखपदाच्या शर्यतीत दोन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच सध्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या काही शिवसेना पदाधिकारी यांचा समावेश आहे. या इच्छुकांकडून मातोश्रीच्या वाऱ्या सुरू असून पालघर जिल्ह्याला नवीन संपर्कप्रमुख मिळाल्यानंतरच शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेमणुका होतील, असे वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट करण्यात आले आहे.