natural gas supply from gail for industries in tarapur closed for seven days zws 70 | Loksatta

तारापूरमधील नैसर्गिक वायुपुरवठा सात दिवस बंद; दुरुस्तीचे काम

पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असा सात दिवस बंद करण्यात आला आहे.

तारापूरमधील नैसर्गिक वायुपुरवठा सात दिवस बंद; दुरुस्तीचे काम
दुरुस्तीचे काम

बोईसर : पालघर जिल्ह्यात केंद्र सरकारची मालकी असलेल्या गेल इंडिया कंपनीकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असा सात दिवस बंद करण्यात आला आहे.

औद्योगिक वसाहतीमधील टाटा स्टील, जे एस डब्ल्यू आणि विराज आलॉयसारख्या पोलाद उत्पादक कंपन्यांना या नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. तर गुजरात गॅस कंपनीकडून औद्योगिक वसाहतीमधील १३० कंपन्या आणि पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. सीएनजी इंधनावर धावणाऱ्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यासाठी गुजरात गॅस कंपनीकडून पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी फिलिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गालगत पूर्वेला समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. बोईसर रेल्वे स्थानकालगतच्या खैरा फाटक रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वे मार्गाच्या खालून मुख्य इंधन वाहिनी गेली आहे.  रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या कामात अडथळा ठरणारी तीन ते चार मीटर खोल रेल्वे मार्गाखालून गेलेली इंधनवाहिनी काढून आठ ते दहा मीटर खोलीत गाडून पुन्हा जोडण्यात येणार आहे. या कामासाठी  सात दिवस वायुपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योग आणि सीएनजी इंधनावर धावणाऱ्या वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नैसर्गिक वायूचा पुरवठा बाधित झाल्याने सीएनजी उपलब्ध असलेल्या फिलिंग स्टेशनवर सीएनजी इंधनावर धावणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या असून  औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे.

औद्योगिक वसाहतीमधील १३० कंपन्यांनी स्वच्छ इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर सुरू केला आहे. पर्यायी इंधन वापरणे बंद केल्याने नैसर्गिक वायूचा पुरवठा आठ ते दहा दिवस बंद झाल्यास कंपन्यांना मोठे नुकसान होणार आहे. गेल इंडिया कंपनीने कमीत कमी वेळात दुरुस्तीचे काम करून नैसर्गिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा. 

वेलजी घोगरी, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चिरग असोसिएशन.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:34 IST
Next Story
गस्तीनौका निरुपयोगी; सागरी सुरक्षेला धोका; मत्स्य व्यवसाय विभागाकडे १८ वर्षे जुनी नौका