डहाणू: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक जगदंबा ‘बोहाडा’ उत्सवाची आज अत्यंत उत्साही वातावरणात सांगता झाली. होळीनंतरच्या धुळवडीपासून सुरू होणारा हा उत्सव म्हणजे आदिवासी संस्कृती, कला आणि अढळ श्रद्धेचा एक अनुपम संगम आहे. सुमारे २५० वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या उत्सवात यंदाही हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. पारंपरिक पद्धतीने टेंभ्याच्या प्रकाशात नाचणारी सोंग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुबक आणि रेखीव असलेले देवदेवतांचे मुखवटे. ऊंबर आणि सागाच्या लाकडातून साकारलेले हे मुखवटे आजही तितकेच जिवंत वाटतात, विशेष म्हणजे यातील काही मुखवटे तर २०० वर्षांहून अधिक जुने असून ते पिढ्यानपिढ्या जतन केले जात आहेत. उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात सादर करण्यात आलेले भीम-बकासुर युद्ध आणि पहाटेच्या सुमारास निघालेली दशमुखी रावणाची मिरवणूक प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. रावणाचे रौद्र रूप आणि त्याचे लयबद्ध नृत्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जाती-धर्माच्या भिंती ओलांडून सर्व स्तरातील नागरिक या सोहळ्यात एकरूप झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मंगळवारी अष्टमीच्या शुभमुहूर्तावर जगदंबा देवीची भव्य महापूजा आणि अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर देवी आणि महिषासुर तसेच शुंभ-निशुंभ यांच्यातील युद्धाचा थरारक प्रसंग जिवंत करण्यात आला. अनिष्टावर इष्टाचा विजय मिळवत जेव्हा जगदंबेची विजयी मिरवणूक निघाली, तेव्हा अवघ्या मोखाड्यातील रस्ते सडा-रांगोळीने सजले होते. घराघरातून देवीवर फुले आणि अक्षतांची उधळण करण्यात येत होती. या मिरवणुकीनंतर साई मंदिराजवळील मैदानात जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगला, ज्यामध्ये अनेक मल्लांनी आपले कसब दाखवले. या निमित्ताने रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले चाकरमानी आणि आदिवासी बांधव एकत्र आल्याने तालुक्यात आनंदाचे भरते आले होते.
आदिवासी कला-संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा बोहाडा उत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, आता गुजरातसह इतर राज्यांतील अभ्यासक आणि पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. आधुनिकतेच्या लाटेतही आपली मूळ संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या मोखाडावासीयांचे कौतुक सर्वत्र होत आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जगदंबा मातेच्या’ जयघोषात या सोहळ्याची सांगता झाली असली, तरी या उत्सवाच्या आठवणी आणि भक्तीचा दरवळ पुढील वर्षभरासाठी नागरिकांच्या मनात कायम राहणार असल्याची खात्री दिली जात आहे.
या बोहाड्यात पालघर सह नाशिक आणि गुजरात मधील भाविक सहभागी झाले होते. दरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली होती. शेकडो दुकानदारांना बोहाड्याच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध झाला असून लाखो रुपयांची उलाढाल झाली. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाला कोणतेही गालबोट न लागता मोठ्या उत्साहात बोहाड्याची सांगता झाली.
