नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील नाचणी (नागली), वरई व इतर तृणधान्य लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने विशेष योजना आली आहे. त्याचप्रमाणे नाचणी लागवड रब्बी हंगामात करण्यासाठी योजना ‘आत्मा’ या कृषी विभागामार्फत आखण्यात येत असून स्थानीय पातळीवर नागली व इतर तृणधान्यांचा दैनंदिन आहारात वापर केल्यास कुपोषणाची समस्या दूर होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना पौष्टिक आहार मिळणे शक्य होणार आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलात सहजपणे तग धरणारे नागलीचे पीक असून डोंगराळ भागात उतारावर त्याची लागवड करण्यात येते. विशेष म्हणजे जमिनीची सुपीकता माफक असली तरी नागली उत्पादन उत्तमरीत्या होत असल्याने जिल्ह्यातील विविध डोंगराळ भागांत या पिकाचे लागवड करण्यास उत्तेजन देण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात ११ हजार ६९० हेक्टरवर नाचणी तर ८२८२ हेक्टरवर वरईची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. ही लागवड वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.

केंद्र सरकारने ३१.५० रुपये प्रति किलो हा नाचणीसाठी किमान भाव निश्चित केला आहे. असे असताना अनेक व्यापारी आदिवासी शेतकऱ्यांकडून त्याची कमी दरात खरेदी करून बाजारात मोठय़ा किमतीत नाचणी विकत असल्याचे दिसून आले आहे. नाचणीचा लागवड वाढवण्यासाठी या पिकाची विक्री करण्यासाठी स्वतंत्र सक्षम यंत्रणा उभारणे तसेच आदिवासी विभागाकडून ज्या पद्धतीने हमी भावाने भात खरेदी केली जाते त्याच धर्तीवर नाचणी खरेदी करण्याची योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पौष्टिक असणाऱ्या तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना त्या अनुषंगाने राज्य सरकारने पालघरसह तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणून त्यांना लागवड वाढविण्यासाठी प्रोत्साहनपर योजना आखणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने नाचणी उत्पादित होणाऱ्या जिल्ह्यात धोरणात्मक बदल करून पौष्टिक असणाऱ्या नाचणीचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करण्याची गरज भासत आहे.

नाचणीचे लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी या पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीचा अभ्यास करणे, शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे मिळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बिजोत्पादन करणे तसेच कुपोषणासाठी त्याचा अधिक प्रभावीपणे वापर करणे गरजेचे आहे. नाचणीची शासकीय पातळीवर खरेदी करण्यासोबत त्याची स्वस्त धान्य दुकानावर सवलतीच्या दरामध्ये वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिका धारकांना नाममात्र दरात गहू व तांदूळ दिला असताना या योजनेत नाचणीचा समावेश करणे गरजेचे झाले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कुपोषण मुक्तीसाठी शासन मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करत असताना बालवाडी व शालेय विद्यार्थ्यांना नाचणीपासून तयार केलेले आंबील, लाडू सारखे खाद्यपदार्थ व वरईचा भात अन्न म्हणून दिल्यास त्यांची पोषण समृद्धी होईल. ओडिसा, कर्नाटक राज्याने तृणधान्य शालेय पोषण आहार समाविष्ट करण्याचे तसेच सवलतीच्या दरात देण्याचे धोरण अवलंबले आहे. आंध्रप्रदेश याच दृष्टीने विचार करत आहे. या पार्श्वभूमीमुळे राज्य सरकारने पालघर, नंदुरबार, अमरावतीसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर असा प्रकल्प राबवण्याची मागणी पुढे येत आहे. वरईचेदेखील जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. त्याचा आहारात विशेष वापर होत नसल्याचे दिसते. वरईची भरडाई करून भगर उत्पादन करण्यासाठी जिल्ह्यात मोजके प्रक्रिया प्रकल्प असल्याने त्याच्या लागवडीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. या पार्श्वभूमीवर गावपातळीवर लहान क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारण्याची तसेच त्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्या दृष्टीने कृषी विभाग विचाराधीन आहे. खरीप हंगामात सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या पीक स्पर्धेत वाडा तालुक्यातील उज्जैनी, सातरोंडे व मांगरूळ येथील तीन आदिवासी शेतकऱ्यांनी नाचणी पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बायफ) चे शास्त्रज्ञ संजय पाटील, वैभव पाटील, कृषीभूषण अनिल पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून लागवडीची माहिती घेतली. या प्रसंगी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढींसाठी झालेल्या प्रयोगाची माहिती दिली व मार्गदर्शन केले.

तृणधान्य लागवड विस्तारावर बायफ २०१० पासून जव्हार येथे काम करीत आहे. त्यामध्ये नाचणी व वरईच्या ठाणे, पालघर जिल्ह्यातील स्थानिक वाणाचे तपशीलवार माहिती संकलन, ३० स्थानीय प्रजातीचे शुद्ध बियाणे निर्मिती करणे, त्यांच्या पौष्टिक गुणधर्म, उत्पन्नाविषयी वैज्ञानिक अभ्यास करणे, त्यापासून आंबील, शिरा, लाडू, पेज, खीर असे पदार्थ तयार करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ते यांना प्रात्यक्षिक देणे, नाचणीच्या पाच प्रचलित वाणांचे ५०० शेतकऱ्यांकडे बीजोत्पादन व लागवड करण्यात आली आहे. जव्हार तालुक्यातील खुशी नाचणी गट (वांगडपाडा) यांच्यामार्फत १० क्विंटल नाचणी लाडूनिर्मिती आणि विक्री केल्याबद्दल त्यांना या गटाला सन २०१७ मध्ये राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. क्रिसॅट या हैद्राबाद येथील संस्थेने नाचणीच्या ७२ वाणांचे संवर्धन केंद्र विकसित केले आहे. पालघर जिल्ह्यात तृणधान्य उगविण्यासाठी आवश्यक भौगोलिक परिस्थिती असून याकरिता शासनाने विशेष योजना राबविणे व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

पारंपरिक तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर
नाचणी पिकाचे १५० पेक्षा अधिक वाण असून त्यापैकी पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने १२ प्रकारांची लागवड होत असे. त्यामध्ये काळपेरी, ढवळपेरी, शितोळी, पितरबेंद्री, दसरबेंद्री या प्रजातींचा प्रामुख्याने समावेश होता. नाचणी लागवडीवर रोग व किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाल्याने तसेच अधिक प्रमाणात पाऊस व सदोष बियाणामुळे अनेक जाती लुप्त पावल्याची माहिती पुढे आली आहे. बायफने जव्हार येथे अनेक नाचणी प्रजातींची लागवड केली असून त्याचबरोबर दूधमोगरा, घोषी, साखळी व काळीवरई असे वरई पिकाचे प्रकार जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. याच बरोबरीने पालघर जिल्ह्यात पिवळा व सफेद राळा व सावा या तृणधान्य जवळपास नामशेष झाल्याचे दिसून आले आहे. याचबरोबरीने यापूर्वी जिल्ह्यात पिकवल्या जाणाऱ्या तृणधान्याच्या नावांचे ज्ञानदेखील विलोपले गेले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need for promotion of healthy cereal cultivation amy
First published on: 27-09-2022 at 00:07 IST