कासा : तलासरी बाजारपेठेतल्या पक्क्या गटारांवर व्यापाऱ्यांनी बांधकाम केले आहे. त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्याची तसदी नगरपंचायतीने घेतलेली नाही. शिवाय गटारांच्या सफाईकडेही साफ दुर्लक्ष केले आहे.
पावसाळय़ात पाणी वाहून जाण्यासाठी तलासरी बाजारपेठेत पक्की गटारे बांधण्यात आली आहेत. ज्यामुळे बाजारात पावसाचे पाणी साचणार नाही आणि पाण्याचा योग्य तो निचरा होईल. पण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या गटारावर पक्की बांधकामे करून गटारे बंद केली आहे. काहींनी तर गटारात भराव टाकले आहेत. यामुळे पावसाळय़ात गटारातून पाणी वाहतच नाही. तर ते तुंबून रस्त्यावर साचते आणि काही व्यापाऱ्यांच्या दुकानातही शिरते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसानही होत आहे.
तलासरी नगर पंचायतीने याबाबत व्यापाऱ्यांना नोटिसा काढून गटारावरील बांधकामे काढून गटारे मोकळी करण्यास सांगितले. परंतु व्यापाऱ्यांनी नगर पंचायतीच्या नोटिशीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे गटारांचा प्रश्न कायम आहे. पावसाळय़ापूर्वी गटारांची सफाई करणे गरजेचे असतानाही, नगरपंचायतीला गटार सफाईसाठी मुहूर्त मिळालेला नाही. तलासरी नगरपंचायत सफाईसाठी जवळपास ७५ लाखाचा ठेका काढते पण दोन वर्षांत तो काढलेलाच नाही. त्यामुळे सफाईच्या नावाने बोंबच आहे.
गटारांसंदर्भात नोटीस काढली आहे. संबंधितांनी लवकरात लवकर गटारांवरील अतिक्रमित बांधकाम काढावे नाही तर कारवाई केली जाईल. -प्रताप कोळी (मुख्य अधिकारी तलासरी नगरपंचायत)