पालघर : सफाळे रेल्वे स्टेशनवरील नव्याने उभारलेल्या एफओबीवरील दुहेरी दरवाज्याच्या लिफ्टचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. हा महत्त्वपूर्ण प्रकल्प डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्यात आला आहे.या लिफ्टचे लोकार्पण खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी सफाळे, माकणे, कर्दळ ग्रामपंचायत प्रतिनिधी, सफाळे स्टेशन कमिटीचे सदस्य, सफाळे विकास कृती समिती, रेल्वे परिसर व्यापारी संघटना तसेच अनेक प्रवासी उपस्थित होते.
नवीन लिफ्ट सुरू झाल्याने सफाळे स्टेशनवरील प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना—मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमादरम्यान खासदार डॉ. सवरा यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.नवीन लिफ्ट सुरू झाल्याने सफाळे स्टेशनवरील सेवा व सुविधा वाढण्यास आणखी एक महत्त्वाची पायरी गाठली गेली आहे.
१५ डिसेंबरपर्यंत एस्केलेटर सुरू होणार
“सफाळे रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १ वर १५ डिसेंबरपर्यंत सरकता जिना (एस्केलेटर) सुरू करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत. भुयारी मार्गासाठी रेल्वेचे डीआरएम यांच्याशी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील नियोजन केले जाईल. सफाळे रेल्वे स्थानकाचा विकास करताना पुढील २५ वर्षांचा विचार करूनच पावले उचलली जात आहेत.” डॉ. हेमंत सवरा, खासदार
