पालघर: जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार लिहिता, वाचता तसेच आकलन करणे शक्य व्हावे तसेच त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने गेल्या शैक्षणिक वर्षात राबविलेल्या निपुण उपक्रमाला समाधानकारक यश लाभल्यानंतर हाच उपक्रम यंदाच्या वर्षी सुरु ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान २.०” अंतर्गत जिल्हास्तरीय नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

भारत सरकारच्या निपुण भारत अभियानाच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यात प्रत्येक मूल हे वाचन, लेखन, आकलन आणि मूलभूत संख्याज्ञानात निपुण व्हावे या उदात्त हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून जिल्ह्यातील ५७ टक्के विद्यार्थी “निपुण” म्हणून घोषित झाले आहेत.

सध्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये “निपुण कृती पुस्तिका” वर आधारित विशेष कृती कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कृती पुस्तिकेवर आधारित दिवस निहाय कृती कार्यक्रम सुरू असून त्याच्या फलनिष्पत्ती चे मापन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये “निपुण चाचणी क्रमांक १'” आयोजित करण्यात येणार आहे.

या चाचणीचे सूक्ष्म नियोजन आणि पूर्वतयारी करण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकूण ८० निवडक तज्ञ शिक्षकांनी सहभाग घेतला. यामध्ये स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि एनएमएमएस या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने उत्तम निकाल देणारे आणि सखोल ज्ञान असलेले ४० अनुभवी शिक्षक समाविष्ट होते. सर्व शिक्षकांनी गटांमध्ये विभागून अध्ययन क्षमता, अध्ययन निष्पत्ती तपासणी आणि २० गुणांच्या चाचणी आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कार्यवाहीचा रोडमॅप तयार केला.

मिशन स्कॉलरशिप, नवोदय व एनएमएमएस चा शुभारंभ

या अभियानातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे निपुण झालेल्या ५७ टक्के विद्यार्थ्यांना पुढील यशाची शिडी मिळवून देणे. केवळ मूलभूत साक्षरता नव्हे, तर या गुणवंत मुलांना विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये चमकवण्यासाठी निपुण पालघर अंतर्गतच “मिशन स्कॉलरशिप, नवोदय आणि एनएमएमएस” हा विशेष उपक्रम सुरू आहे.

या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील निपुण विद्यार्थ्यांसाठी या ४० तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून तालुकानिहाय मार्गदर्शन, सराव चाचण्या आणि विशेष मार्गदर्शन याचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल येईल.

मान्यवरांचे मार्गदर्शन

या कार्यशाळेला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “५७ टक्के हे यश समाधानकारक असले तरी आपले अंतिम ध्येय १०० टक्के इतके आहे. उर्वरित ४३ टक्के विद्यार्थ्यांना निपुण करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने मिशन म्हणून काम करावे. जिल्हा परिषद प्रशासन त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच निपुण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घडवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे, त्यासाठी सांघिक प्रयत्न करूया, असे त्यांनी आवाहन केले

हे संपूर्ण गुणवत्ता विकास अभियान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करत असून त्यांनीही या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.