पालघर : पालघर जिल्हा परिषदेची आठ तासांपेक्षा अधिक काळ सुरू राहिलेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच प्रत्यक्षात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ५७ सदस्य हजर होते. अनेक सदस्यांनी आपापल्या गटांमधील प्रलंबित कामे व समस्या बैठकीत मांडल्या. प्राथमिक शिक्षणासंदर्भात जिल्ह्यात भेडसावत असणाऱ्या विविध समस्यांना शिक्षणाधिकारी गांभीर्याने दखल घेत नाही तसेच निवडून आलेल्या सदस्यांना  टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचे आरोप या सर्वसाधारण सभेत झाले. सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची मागणी रेटून धरली व नंतर या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला.  त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागातील काही निविदा अंदाजपत्रकातील रकमेपेक्षा कमी दराने भरल्या गेलेल्या निविदांसंदर्भातील अनामत रक्कम उशिराने जमा करण्यात आल्याबद्दलचे आक्षेप या सभेत नोंदविण्यात आले. तरीदेखील या निविदांना सभेने मंजुरी दिली.  जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र व  उपकेंद्र बांधून तयार असले तरीदेखील त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने अशी ती रिकामी असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. आवश्यक मनुष्यबळ मंजूर झाल्यानंतरच  केंद्राची नवीन वास्तूसाठी खर्च मंजूर करण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली.