निखिल मेस्त्री
पालघर: जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणारा शालेय पोषण आहार योजनेला पालघर जिल्ह्यात घरघर लागली आहे. योजनेंतर्गत देण्यात येणारा तांदूळ आणि विविध कडधान्य ऑगस्ट २०२१ पासून वितरित करण्यात आलेला नाही. परिणामी, दोन लाखांपेक्षा जास्त लाभार्थी असलेले विद्यार्थी या पोषण आहारापासून वंचित राहिलेले आहेत.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शाळेतील पटनोंदणी वाढवणे, दैनंदिन उपस्थिती वाढवणे, दुपारनंतरची शाळेतील गळती रोखणे, धर्म- जात- लिंग व भेदभाव नष्ट करणे अशा उद्दिष्टांकरिता विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. मध्यान्ह भोजनातून शिजवलेला आहार विद्यार्थ्यांपर्यंत करोना स्थितीच्या पूर्वी मिळत होता. नंतर गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिजवलेल्या भोजनाऐवजी तांदूळ व कडधान्य दिले जात होते. ऑगस्ट २०२१ पर्यंत तो वितरित करण्यात आला. मात्र त्यानंतर या वितरणाला खीळ बसली आहे. पालकवर्ग या आहाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो मिळाला नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. पोषण आहार पुरवण्यासाठी ठेकेदार नेमणे हे थेट संचालक कार्यालयाकडून केले जाणारे काम आहे. त्यामुळे त्यांनी पुरवठादार ठेकेदार नेमल्याशिवाय आहार वाटप होणार नाही, असे या कार्यक्रमाच्यावेळी जिल्हा कार्यालयातील एक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार पाहिले तर पालघर जिल्ह्यासाठी ठेकेदारच नियुक्त न केल्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे सात महिने आहाराचे वाटप झालेले नाही.
ठेकेदाराबाबत अस्पष्टता
राज्यातील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवठादार नेमणूक करण्यात आलेले नाहीत. पुरवठा करणाऱ्या धान्याच्या दरासाठी हे प्रकरण न्यायालयाकडे प्रलंबित असल्याचे समजते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही वितरण करणारा पुरवठादार नेमण्यात आलेला नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत अनेक वेळा संचालक कार्यालयाकडे पुरवठादार नेमण्यासाठी तगादा व पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, मात्र त्यानंतरही ठेकेदार नेमण्याबाबत अस्पष्टताच आहे.
दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांना व त्यांच्या मुलांना या पोषण आहाराचा चांगला फायदा होतो. पालक कामावर गेल्यानंतर विद्यार्थी नैतिक जबाबदारी म्हणून हा आहार शिजवून खात आहेत. मात्र आता तो मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, असे डहाणू तालुक्यातील एका शिक्षिकेने सांगितले.
पोषण आहार
पोषण आहार कार्यक्रमाअंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार किलो तांदूळ, एक किलो मूगडाळ व एक किलो हरभरा असे कडधान्य देण्यात येते. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सहा किलो तांदूळ, दीड किलो मूगडाळ, दीड किलो हरभरा आदी कडधान्य देण्यात येतात.
लाभार्थी विद्यार्थी
१ ली ते ५ वी – १४८८४३
६ वी ते ८ वी – ८९१६८
२०२१ चे एकूण अनुदान – २० कोटी ६५ लाख १४ हजार
खर्च, अनुदान
खर्च २०२१ – १० कोटी ६ लाख ८५ हजार
शिल्लक अनुदान – १ कोटी १८ लाख ५० हजार
शिक्षण संचालक कार्यालयाने परत मागविलेली रक्कम – ९ कोटी ३९ लाख ८० हजार