पालघर: ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याबाबत तसेच इतर हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले असल्याने तसेच समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी २९ एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या सभेसाठी सिडको मैदानावर भव्य मंडप उभारले जात आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेमध्ये काही बदल केले आहेत.
पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून या जिल्ह्यासाठी मोठय़ा प्रमाणात ओबीसी समाज बांधव येण्याची शक्यता असून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था पालघर शहरालगत असणाऱ्या सिडको मैदान, सर्कस ग्राउंड तसेच जीवन विकास शाळेच्या मैदानावर करण्याचे योजिले आहे. यासाठी ५०० स्वयंसेवकांची नेमणूक केली असून या मोर्चाच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व इतर व्यवस्थादेखील हाती घेण्यात आली असून ही व्यवस्था अंतिम टप्प्यात आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
वाहतुकीत बदल
पालघर शहरातील वाहतुकीवर या मोर्चाचा परिणाम होण्याची शक्यता पाहता पालघर- बोईसर मार्गावरील कोळगावपर्यंतच्या भागातील वाहतूक शुक्रवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पालघर शहराकडून बोईसरकडे जाण्यासाठी खारेकुरण- मोरेकुरण मार्गे उमरोळी तर बोईसरच्या बाजूने पालघरला येणारी वाहने कोळगाव रेल्वे फाटककडून नंडोरे मार्गे वळविण्यात येणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने पालघरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.