पालघर : जिल्हाधिकारी कार्यालयापासून पुढे पालघर-बोईसर रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. त्यादरम्यानचे विजेचे खांब रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरले आहेत. प्रस्तावित रुंदीकरणाच्या मध्यभागीच हे खांब येत असल्याने ते हटवल्याशिवाय रुंदीकरण शक्य नाही.
पालघर मनोर रस्ता रुंदीकरणातही विजेचे खांब मध्यभागी येत होते. महावितरणने ते नव्या रस्त्याच्या पलीकडे स्थलांतरित न केल्याने आजही पालघर-मनोर रस्त्यावर या खांबांचा अडथळा होतो. पालघर-बोईसर रस्त्याच्या कामाच्या बाबतीतही असेच होणार का, असा प्रश्न जनता विचारत आहेत. महावितरणने गेल्या दोन वर्षांत खांब स्थलांतर प्रक्रिया पूर्ण केली नाही, आता रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊनही जर हे खांब तसेच ठेवले तर रुंदीकरणाचा फायदाच काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
बोईसरच्या जीवन विकास विद्यालयापासून औद्योगिक वसाहत परिसरात अनेक विजेचे खांब या रस्त्यात अडथळा ठरत आहेत. रस्ता रुंदीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महावितरण विभागाला विजेच्या खांबाचे स्थलांतरण करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. तसेच या कामाचे अंदाजपत्रक मागवले होते. मात्र महावितरणने उत्तर देताना सांगितले की, या कामाच्या निविदा प्रक्रियेचा टप्पा अजूनही प्रगतिपथावर आहे. त्यासाठीचे पैसे भरले गेले नाहीत. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतरही विजेचे खांब स्थलांतरित करता येऊ शकतील. महावितरणच्या या बेजबाबदार स्पष्टीकरणावर संताप व्यक्त होत आहे.
रस्ता रुंदीकरण केल्यानंतर विजेचे खांब हलवल्यास रस्ता पुन्हा खोदला जाईल आणि त्याची डागडुजी करण्यासाठी पुन्हा निधी उभारावा लागेल. त्यामुळे शासनाचा पर्यायाने जनतेने दिलेला निधी खर्च
करताना शासनाचे विभाग काहीच नियोजन करत नाहीत का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
विजेचे खांब स्थलांतर करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. बहुधा या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून निधी येणे आवश्यक आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम केल्यानंतरही खांब हलवले जाऊ शकतात.-प्रताप मचिये, कार्यकारी अभियंता, महावितरण, पालघर विभाग
वारंवार पत्रव्यवहार करूनही विजेचे खांब स्थलांतरण करण्याबाबतच्या कामाचे अंदाजपत्रक महावितरणने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेले नाही. ते दिल्यानंतर त्याची अनामत रक्कम जमा करून पुढील कार्यवाही केली जाईल.-आशीष संखे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर
संबंधित खात्यांनी समन्वयाने हे काम करणे आवश्यक होते, मात्र कामाला लागणाऱ्या वेळामुळे दोन्ही खात्यांत अजिबात समन्वय नसल्याचे दिसते. खांब हटवल्यानंतरच रस्ता रुंदीकरण करावे, अशी आमची मागणी आहे.-प्रल्हाद कदम, माजी नगरसेवक, पालघर नगर परिषद