scorecardresearch

आदिवासी पाड्यातील नव्वदीच्या आजोबांना मिळाले जीवदान!

दोन दिवस तसेही नव्वदीचे गुलाब हाडळ आजारी अवस्थेतच होते. त्यांची हालचाल बंद पडल्यानं ग्रामस्थांना वाटलं की त्यांचं निधन झालं. पण…

palghar health news
रुग्णाच्या घराबाहेरच डॉक्टरांनी दिले उपचार (फोटो – महाराष्ट्र आरोग्य विभाग)

संदीप आचार्य

आदिवासी पाड्यातील त्या छोट्याशा घरापाशी हळूहळू लोक जमू लागले. गेले दोन दिवस तसेही नव्वदीचे गुलाब हाडळ आजारी अवस्थेतच होते. आज त्यांची हालचाल बंद पडली आणि त्यांचे निधन झाल्याचे समजून पाड्यातील आदिवासी जमू लागले. गावातील माजी सभापतीही आले. त्यांना काही शंका आली व त्यांनी जवळच्या प्राथमिक केंद्रातील डॉ. शेषराव सूर्यवंशी यांना फोन केला. तात्काळ डॉ. सुर्यवंशी हे गावठण पाड्यातील त्या घरी पोहोचून त्यांनी रुग्णाला तपासले तेव्हा तो मृत नसून बेशुद्ध असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी आपल्या जवळील सलाईन काढून लावले. इंजेक्शने दिली आणि काही वेळताच नव्वदीचे गुलाब शुद्धीवर आले. डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक केंद्रात दाखल करून घेण्यासाठी जीपमध्ये बसण्याची विनंती केली. मात्र ती घुडकावून लावत तुम्ही इथेच काय ते उपचार करा, असा आग्रह गुलाब यांनी धरला. त्यानंतरचे दोन-तीन दिवस डॉक्टरांनी लहान मुलाप्रमाणे त्यांच्यावर औषधोपचार केले. आज गुलाब आजोबा ठणठणीत बरे होऊन फिरत आहेत. गुलाब यांच्या घरातील तसेच पाड्यातील आदिवासी डॉक्टरांना त्यांना जमेल तशा पद्धतीने धन्यवाद देत आहेत.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यात जेथे रस्ते संपतात, अशा दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या माध्यमातून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणपणे २८१ डॉक्टर या भरारी पथकात असून बहुतेक पथकांना एक जीप व सहाय्यक दिले जातात. दुर्गम पाड्यांमध्ये जाऊन रोज आरोग्य तपासणी करणे हे त्यांचे प्रमुख काम. याच बरोबर शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्याची तपासणी करणे, गरोदर माता तसेच स्तनदा मातांंवरील उपचार करणे, अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याच्या तपासणी करून कुपोषित बालके शोधून त्यांच्यावरील उपचाराची जबाबदारीही या डॉक्टरांवर असते. डॉ. शेषराव सूर्यवंशी यांची पालघर जिल्ह्यांतर्गत विक्रमगडच्या कुरजे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करसुड येथे गेले अनेक वर्षांपासून नियुक्ती असून येथील आठ पाड्यांमध्ये नियमितपणे आरोग्य तपासणीचे काम ते करतात. आठ पाड्यांची मिळून साधारणपणे लोकसंख्या तीन हजार एवढी असून सकाळी दहा ते सहा या वेळेत रोज एका पाड्यावर जाऊन आरोग्य तपासणी करणे व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रात्री येणारे रुग्ण तपासणी करण्याचे काम डॉ सुर्यवंशी यांना करावे लागते. दोन दिवसांपूर्वी ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जात असताना गावठण येथून रमण कोरडा यांनी डॉक्टरांना फोन करून एक रुग्ण निपचित पडला आहे तातडीने या अशी विनंती केली.

याबाबत डॉ. सूर्यवंशी यांना विचारले असता, फोन आल्याबरोबर मी भरारी पथकाच्या गाडीचा चालक सुभाष इसमे व परिचारिका सरिता पागी यांच्यासह गावठणात पोहोचलो. घराच्या पडवीत एका चादरीवर गुलाब निपचित पडले होते. नाडी तपासली. आवश्यक त्या चाचण्या केल्या. ते बेशुद्ध पडले होते. रक्तदाब खूपच कमी झाला होता. गेले दोनतीन दिवस त्यांनी काहीही खाल्ले नव्हते. चौकशी केली तेव्हा ताप-सर्दीमुळे त्यांनी खाल्ले नसल्याचे समजले. माझ्याकडील औषधाच्या किटमधून सलाईन काढून प्रथम सलाईन लावले तसेच इंजेक्शन दिले. थोड्यावेळाने ते शुद्धीवर आल्यानंतर चहा बिस्कीट दिले.

खरतर त्यांचे वय व प्रकृती याचा विचार करून त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी हलवणे आवश्यक होते. गाडीही तयार होती. गुलाब आजोबांना विनंती केली. मात्र ते काही प्राथमिक आरोग्य केंद्रात यायला तयार नव्हते. खूप आग्रह केल्यानंतरही डॉक्टर तुम्हीच मला काय उपचार करायचे ते इथेच करा असे त्यांनी सांगितले. त्यानंतर चारपाच दिवसांची औषधे दिली. खाण्यापिण्याचे पथ्य सांगितले. सुरुवातीला मलेरियाची चाचणीही केली. रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब आदी ज्या चाचण्या करणे आवश्यक आहे त्या केल्या. माझ्यासाठी खरतर नव्वदीच्या गुलाब आजोबांवरील उपचार ह एक आव्हान होते असे डॉ सुर्यवंशी म्हणाले. आज आजोबांची प्रकृती उत्तम दुर्गम भागात आरोग्य सेवा देताना अशी अनेक आव्हाने पेलावी लागतात. अर्थात आरोग्य विभागाकडून त्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रशिक्षण आम्हाला दिलेले असते तसेच पुरेशी औषधे व चाचणी किटही आमच्याबरोबर कायम असतात असेही त्यांनी सांगितले.

आदिवासी दुर्गम भागात काम करणे हे एकरत एक आव्हान आहे. त्यातही पावसाळ्यात अनेकदा गाडी सोडून देऊन पायी चालत जावे लागते. आमचा मुक्काम प्राथमिक केंद्रावर असला तरी तेथून पाड्यांचे अंतर साधरणपणे तीन ते पाच किलोमीटर एवढे असते. एखादी गर्भवती महिला अडली तर सुटका करणे हे खरेच आव्हान असते. वृद्ध लोकांवरील उपचार हेही एक आव्हान असते कारण मुळातच पुरेशी जीवनसत्वांची त्यांच्यात कमतरता असते. गेल्या दहा वर्षात अनेक गभीर रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान पेलावे लागले. पण गुलाब आजोबा बरे झाल्याचा जो आनंद मी अनुभवतो आहे तो आगाळाच म्हणावा लागेल असे डॉ सुर्यवंशी यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-09-2023 at 19:33 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×