तारापूर औद्योगिक वसाहती मधील भगेरीया इंडस्ट्रीज या कारखान्यामधील स्फोटाच्या घटनेला तीन दिवस उलटत नाहीत तोच आज पुन्हा एका बंद कारखान्यात स्फोट होऊन आग लागली. या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यानी घटनास्थळी पोचून जवानांनी एका तासात आग आटोक्यात आणली.

हेही वाचा- चारोटी उड्डाणपुलावरील अंधारयात्रा कायम; पथदिवे बंद पडल्याने वाहनचालकांच्या मार्गात अडचणी

तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्लॉट क्र.एन-२२ वरील औरा ऑइल हा कारखाना मागील सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास या कारखान्यातील भंगार चोरीच्या उद्देशाने आत शिरलेल्या चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने भंगार कापत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे कारखान्याला आग लागून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तर स्फोट होताच बाकीचे चोर आणि जेसीबी चालकाने जेसीबीसह पळ काढला. या स्फोटाची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तर अग्निशमन दलानच्या दोन बंबानी एका तासानंतर आग आटोक्यात आणली.

हेही वाचा- तारापूरमध्ये कारखान्यात स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू

तारापूर औद्योगिक वसाहती मधील भगेरीया इंडस्ट्रीज या कारखान्यात २६ ऑक्टोंबर रोजी स्फोट होऊन तीन कामगार ठार झाले होते तर १२ कामगार गंभीर जखमी झाले होते. या घटनेला तीन दिवस होत नाहीत तोच पुन्हा एकदा स्फोट झाल्याने औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीत स्फोट, आग, वायू गळती बरोबरच भंगार चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून यामुळे आजूबाजूच्या कुंभवली, कोलवडे, सालवड, सरावली या गावातील नागरीक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.