कासा : जव्हार हे निसर्गरम्य आणि थंड हवेचे उंच ठिकाण आहे. येथे अनेक पर्यटनस्थळे आहे. पावसाळय़ात येथील निसर्गाला अधिक भर येतो. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे यंदाही पर्यटकांनी येथील पर्यटनाचा आनंद अनुभवण्यासाठी आपली पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गनिर्मित जव्हार तालुक्यात संस्थांकालीन नवा-जुना राजवाडा, शिरपामाळ, हनुमान पॉइंट तर दाभोसा, काळमांडावी, हिरडपाडा असे निसर्गरम्य धबधबे आहेत. या भागात पर्यटक आल्यानंतर येथील स्थानिक नागलीची गरम गरम भाकरी, उडदाचा भुजा, मिरचीचा ठेचा, गावठी कोंबडा आणि या भागातील डोंगरदऱ्यातील निसर्गनिर्मिती रानपालेभाज्यांचा आस्वाद घेतात. धबधब्यावरती जाण्यासाठी पर्यटकांची विशेष ओढ असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जव्हारला पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा मिळाल्याने, निसर्गरम्य ठिकाणी शनिवार आणि रविवारसह रोजच शेकडो पर्यटक येथे हजेरी लावतात. मात्र आनंद घेताना मौजमजा करताना अनेक वेळा या पर्यटनस्थळी आपला जीव गमवावा लागणाऱ्या घटना घडत असतात. मागील दोन वर्षांपूर्वी एकाच वेळी पाच तरुणांचा पाय घसरून काळमांडावी डोहात पडून मृत्यू झाला होता. तसेच मागील वर्षी कामोठे, ठाणे येथील ४५ वर्षीय पर्यटकाचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे. अनेक तरुण पर्यटनस्थळी मद्यप्राशन तिथे दंगामस्ती करत असल्यामुळे असे प्रकार घडतात. त्याकरिता आठवडय़ातील शनिवार व रविवार अशा दोन दिवस जव्हार पोलीस ठाणेअंतर्गत पोलीस बंदोबस्त ठेवल्यास अशा प्रकारांवर बंदी येईल. त्यासाठी येथे पोलीस बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ourists head towards jawahar for scenic tourism amy
First published on: 07-07-2022 at 00:04 IST